Home Maharashtra माऊली मंदिरातील चोरी प्रकरणी संस्थानची कारवाई, दोन कर्मचारी निलंबित, दोघांची सेवा समाप्त…

माऊली मंदिरातील चोरी प्रकरणी संस्थानची कारवाई, दोन कर्मचारी निलंबित, दोघांची सेवा समाप्त…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात २२ मे २०२६ रोजी घडलेल्या चोरीच्या प्रकारानंतर संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत आळंदी संस्थान प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासे मागविण्यात आले होते. त्यानंतर २९ मे रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व खुलासे व अहवालांचे परीक्षण करून जबाबदार कर्मचाऱ्यांविरुद्ध निर्णय घेण्यात आला. 

        विश्वस्त मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, कामातील निष्काळजीपणा आढळून आल्याने एका हंगामी सेवकाची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच एका सहाय्यक व्यवस्थापकाचीही सेवा समाप्त करण्यात आली आहे.

        दरम्यान, रोखपाल व आचारी यांना निलंबित करण्यात आले असून, संबंधित प्रकरणातील पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यंत तपासास सहकार्य करण्यासाठी त्यांना दररोज कार्यालयात उपस्थित राहून हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

        याशिवाय, व्यवस्थापनातील हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देत प्रमुख व्यवस्थापकांना समजपत्राद्वारे सक्त ताकीद देण्यात आली आहे.

       सदर कारवाईबाबतची माहिती सर्व विश्वस्तांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली असून, संस्थानच्या कामकाजात शिस्त व जबाबदारी कायम राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आल्याचे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.