शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर :- अंबुजा फाउंडेशन उत्तम कापूस उपक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील करंजी येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत उपस्थित महिलांनी उत्स्फूर्तपणे १८२ सीड बॉल्स (बियांचे गोळे) तयार केले.
अंबुजा फाउंडेशनचे लोकेशन इनचार्ज मंगेश ठोंबरे आणि व्यवस्थापक स्नेहा गिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका तथा प्रक्षेत्र अधिकारी गायत्री विनायक श्रीरामे आणि सविता जुनाघरी यांनी उपस्थित महिलांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जाणारा पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस न राहता,निसर्गाचे रक्षण ही आपली दैनंदिन जबाबदारी कशी आहे,यावर त्यांनी प्रकाश टाकला.
सध्या वाढते प्रदूषण,बेसुमार जंगलतोड,ग्लोबल वॉर्मिंग आणि सातत्याने वाढणारे तापमान या अत्यंत गंभीर समस्या बनल्या आहेत.या समस्यांवर मात करण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे आणि हवामान बदलाविषयी जनजागृती निर्माण करणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
महिलांनी तयार केलेले हे सीड बॉल्स आगामी पावसाळ्यात रिकाम्या जागांवर टाकून हरित क्रांतीसाठी हातभार लावला जाईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या शिबिराला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



