दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि वारीचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट देऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीत वारी व्यवस्थापन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा यंत्रणा तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आषाढी वारी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावी यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
वारीदरम्यान लाखो भाविक आळंदीत दाखल होत असल्याने त्यांच्या सोयीसुविधांबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन, स्वच्छता व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी आणि सुरक्षा यंत्रणेची सज्जता यावर भर देण्यात आला.
यावेळी आळंदी नगरपरिषद व आळंदी ग्रामस्थांच्या वतीने विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, सभागृह नेते सचिन गिलबिले, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, नगरसेविका पूजा घुंडरे, नगरसेवक गोविंदा कुऱ्हाडे, कालिदास तापकीर तसेच विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.



