ऋग्वेद येवले
उपसंपादक
वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, साकोली येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था संचालित या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यूजीसी नेट (शारीरिक शिक्षण) परीक्षेत यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी राहुल विनोद बाबोटे यांनी लेक्चररशिपसाठी पात्रता प्राप्त केली, तर सुभाष सुखराम कापगते यांनी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) परीक्षा उत्तीर्ण करून संस्थेचे नाव गौरवान्वित केले. तसेच याच क्रमात रेल्वे विभागाची परीक्षा उत्तीर्ण करून शारीरिक शिक्षक पदासाठी सत्यम कुमार यांची निवड झाली. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयात तिन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या यशाची ही परंपरा कायम राहो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव डॉ. वृंदा करंजेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, डॉ. जितेंद्र कुमार ठाकुर, प्रा. नीरज अतकरी, डॉ. पुखराज लांजेवर, डॉ. सुनील आकुलनेकर, डॉ. सुनील कापगते, प्राध्यापक अजय कांबळे, अशोक कुमार मीणा, शाहीद सईद, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आपल्या पालकांना दिले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाप्रती समर्पित राहून सातत्याने परिश्रम करावेत व भविष्यातही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये यश मिळवून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. जितेंद्र कुमार ठाकुर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे कोणतीही यशस्वीता प्राप्त करता येते. परिश्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो. सातत्यपूर्ण प्रयत्न, शिस्त आणि समर्पण हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. मनापासून मेहनत घेतल्यास जीवनातील प्रत्येक ध्येय गाठता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
महाविद्यालय परिवाराने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



