Home Maharashtra नवेगाव पांडव “बल्ले बल्ले”!… — सुपर-१०० उपक्रमात तीन विद्यार्थिनींची भरारी कौतुकास्पद… 

नवेगाव पांडव “बल्ले बल्ले”!… — सुपर-१०० उपक्रमात तीन विद्यार्थिनींची भरारी कौतुकास्पद… 

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

नागभीड :-

      चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘चांदा ज्योती सुपर-१००’ या उपक्रमात नवेगाव पांडव येथील नेवाजाबाई हितकारीणी विद्यालयाने आपले नाव कोरले आहे.

    या विद्यालयातील धनश्री ज्ञानेश्वर नन्नावरे,श्रुती भाऊराव नन्नावरे आणि अक्षरा अज्ञान लोणारे या तीन गुणवंत विद्यार्थिनींनी जिल्ह्यातील कठीण चाळणी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत ‘सुपर-१००’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

      अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास ८ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यातून 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.  

       या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून एकाच विद्यालयातील तीन विद्यार्थिनींची निवड होणे,ही शाळेसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.

      या निवडीमुळे या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या डॉक्टर किंवा अभियंता होण्याच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले आहेत.जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे या विद्यार्थिनींना पुढील उच्च शिक्षणासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

    विशेष म्हणजे,त्यांच्या निवासाचा आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च शिक्षण विभाग उचलणार असल्याने,त्यांच्यासाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची दारे आता पुर्णपणे उघडली गेली आहेत.

        विद्यार्थिनींच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण नवेगाव पांडव परिसरातून आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

       या यशाबद्दल संस्थेचे सर्वेसर्वा अशोकजी भैया,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिन्ही विद्यार्थिनींचे मनापासून अभिनंदन केले आहे. 

       “ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य संधी मिळाली तर ने.हि.विद्यालयाचे योगदान सर्वतोपरी असते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.