Home Maharashtra “विरोधात बोलले म्हणून कराळे मास्तरांची संस्था बंद करणार का?” – वडेट्टीवारांचा सरकारला...

“विरोधात बोलले म्हणून कराळे मास्तरांची संस्था बंद करणार का?” – वडेट्टीवारांचा सरकारला सवाल… — ‘फिनिक्स अकॅडमी’वरील कारवाईवरून हुकूमशाहीचा आरोप….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

     विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश कराळे मास्तर (वर्धा) यांच्या ‘फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी’वर करण्यात आलेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “केवळ राजकीय वैमनस्यातून एका चांगल्या शैक्षणिक संस्थेचा बळी दिला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

वडेट्टीवारांच्या भाषणातील महत्वपूर्ण खालील मुद्दे…

राजकीय सूडबुद्धीचा आरोप….

         “नितेश कराळे मास्तर हे आदिवासी मंत्र्यांच्या मुलीच्या विरोधात प्रचाराला गेले होते, फक्त याच कारणास्तव त्यांच्या संस्थेची चौकशी लावली गेली का?” असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारला.

उत्कृष्ट रेकॉर्डची दखल का नाही?….

        कराळे मास्तरांची संस्था उत्कृष्ट काम करत असून दरवर्षी १५०-२०० विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू होतात. २०० पैकी १०० मुलं नोकरीला लागतात, असा रेकॉर्ड असताना ही संस्था बंद करण्याचे पाप सरकार का करत आहे?

चौकशीत काहीच आढळले नाही….

      “संस्थेची चौकशी केली,पण त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. तरीही ही संस्था का बंद केली? विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी हुकूमशाहीचा वापर केला जात आहे का?” असे वडेट्टीवार कडाडले.

विद्यार्थ्यांचे समर्थन…

        आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांना ८६२ मुलांनी लेखी पत्र देऊन ही संस्था उत्तम असल्याचे सांगितले आहे.तरीही केवळ द्वेषापोटी आदिवासी मुलांचे नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी….

     “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडणे किंवा संविधानावर बोलणे हा गुन्हा आहे का? लोकशाहीत आम्हाला बोलायचा अधिकार आहे की नाही?” अशा शब्दांत त्यांनी सरकारची कोंडी केली.

काय आहे नेमकं प्रकरण?….

         नितेश कराळे मास्तर हे आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. आदिवासी विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणातून त्यांची संस्था वगळण्यात आल्याने किंवा त्यावर निर्बंध आल्याने वडेट्टीवारांनी हा प्रश्न विधानसभेत लावून धरला आहे.

      “एखादा माणूस विरोधात बोलला म्हणून त्याचं घर किंवा संस्था उद्ध्वस्त करणं ही लोकशाही नाही,” अशा शब्दांत वडेट्टीवारांनी सरकारला बजावले.