Home Maharashtra दर्यापूर येथिल लोक न्यायालयात 168 प्रकरणे निकाली…

दर्यापूर येथिल लोक न्यायालयात 168 प्रकरणे निकाली…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

         राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधि सेवा समिती दर्यापूर यांच्या वतीने दर्यापूर येथिल न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे 14 मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयामध्ये दर्यापूर येथिल सर्व न्यायालयातील प्रलंबित 87 प्रकरणे व 81 दाखलपूर्व प्रकरणे आपसांत समझोता होवुन निकाली करण्यात आली. एकूण 168 प्रकरणे निकाली करण्यात आली.

         न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात एकाच दिवशी एकाच निर्णयात निकाली झाल्यामुळे त्यामधिल पक्षकारांची कोर्टबाजीतुन सुटका झाली आहे व त्यांचा वेळ, पैसा, श्रम व मानसिक त्रास वाचला आहे.

          लोक न्यायालयासाठी एकूण पाच पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. पॅनल प्रमुख न्यायाधिश म्हणुन जिल्हा न्यायाधिश सत्यवान डोके, दिवाणी न्यायाधिश महेश शिलार , आशिष जोशी साहेब, अजयप्रकाश यादव व एस. डी. कमलाकर यांनी काम पाहीले. तसेच लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयाच्या अधिक्षक श्रीमती मोरे , सहायक अधिक्षक चतुर, नाझर, विनोद गवई, न्यायालयीन कर्मचारी सिद्धार्थ लोणारे व अभिजीत धांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

एका मोटार अपघात प्रकरणात दिली दिड कोटींची नुकसान भरपाई…

           सदर लोक न्यायालयामध्ये एका मोटार अपघात नुकसानभरपाईच्या प्रकरणात अर्जदार व विमा कंपनीमध्ये आपसांत तडजोड होवुन विमा कंपनीने मृतकाच्या वारसांना एक कोटी पन्नास लाख रुपये नुकसानभरपाई देवुन सदर प्रकरण लोक न्यायालयात निकाली निघाले. 

           सदर प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी आहे की, मृतक नामे कैलास नारायण कापरे हे चंद्रपूर येथिल सुपर थर्मल पाॅवर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये कार्यरत असताना दि 8 फेब्रुवारी 22 ला मोटारसायकलवरुन जात असताना एका भरधाव वेगात येत असलेल्या टीप्पर ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली व त्यामध्ये ते गंभिर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वेळेस मृतकाचे वय 30 वर्षे होते. मृतकाच्या मागे त्यांची पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आईवडील आहेत. त्यांनी सदर अपघातात कैलास कापरे यांचा मृत्यू झाला व त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला म्हणुन नुकसानभरपाई मिळण्यासाठी अचलपूर येथिल जिल्हा न्यायालयात टीपर ट्रकचा चालक, मालक व विमा कंपनीच्या विरोधात प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरण प्रलंबित असताना दि 25 जुलै 25 रोजी दर्यापूर येथे नव्याने जिल्हा न्यायालयाची स्थापना करण्यात आली. सदर प्रकरणातील अर्जदार हे अंजनगाव सुर्जी येथे दर्यापूर न्यायालयाच्या न्यायकक्षेत रहात असल्यामुळे सदर प्रकरण दर्यापूर जिल्हा न्यायालयात वर्ग झाले. 

           14 मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयासमोर सदरचे प्रकरण ठेवण्यात आले होते. सदर प्रकरणामध्ये मृतकाचे वारस व गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये लोक न्यायालयाचे पॅनल प्रमुख, जिल्हा न्यायाधिश सत्यवान डोके व पॅनल मेंबर ॲड. लिना गहेरवाल यांच्या पॅनल समोर एक कोटी पन्नास लाख रुपयांत तडजोड होवुन नुकसानभरपाईची रक्कम इन्शुरन्स कंपनीने मृतकांच्या वारसांना देण्याबाबत समझोता करण्यात आला. सदर प्रकरणात मृतकांच्या वारसांतर्फे ॲड. व्ही. आर. गोडबोले व गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे ॲड. अभिजीत तनपुरे यांनी काम पाहीले.