उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर :- गत आठवड्यापासून उन्हाची तिव्रता अचानक वाढली असून उष्णतेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा नेहमीच अग्रस्थानावर असतो.यावर्षीसुध्दा तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघाताबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि. 11) आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,मनपा आयुक्त अकुनूरी नरेश,निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले,दिवसा व रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली असून सामान्यपेक्षा तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
दुपारी 12 ते 4 या वेळात कोणतेही शासकीय कार्यक्रम घेऊ नये,लहान मुले,वयोवृध्द नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांची विशेष काळजी घ्यावी.प्रत्येक स्तरावर उष्माघाताबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
शाळा,अंगणवाडी आदींच्या वेळेत बदल करण्याचे शिक्षण विभागाने निर्देश द्यावे,अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
उष्माघातासंदर्भात आजाराची लक्षणे….
1)चक्कर येऊन पडणे,2) फेफरे येणे / झटके येणे,3) झोपेतून उठण्यास त्रास येणे / उठता न येणे,4) गोंधळल्यासारखे बोलणे / वागणे,5) श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे,6) शरिराचे तापमान 105 अंशापेक्षा अधिक होणे,7) स्नायूत पेटके येणे,8) चिडचीड होणे,9) डोकेदुखी,10) अशक्तपणा येणे,11) मळमळ व उलटी होणे,12) अधिक घाम येणे.
उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता काय करावे….
1) पुरेसे पाणी प्यावे,तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
2) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
3) दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
4) सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
5) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरा.
6) प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा.
7) उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके,मान, चेहरा झाकण्यात यावा.
8) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे,लिंबू-पाणी,ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
9) अशक्तपणा,डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
10) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे.
11) सूर्यप्रकाशाचा थेट संबध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.
12) सकाळच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
काय करू नये….
1) उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.
2) दारू,चहा,कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
3) दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
4) उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
5) लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
6) गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
7) बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
8) उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावी.



