दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
मुंबई : ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण व मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी उत्साहात पार पडले. यावेळी स्पर्धेच्या नियोजनाचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाच्या स्पर्धेच्या भव्य-दिव्य आयोजनाबद्दल आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने ६८ वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा १८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेचा समारोप सोहळा देखील दिमाखात पार पडणार असून, त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस यांना आयोजकांकडून देण्यात आले. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यंदाच्या स्पर्धेतील ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मानाची गदा आणि फॉर्च्युनर कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै.योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील, कृष्णाजी बुचडे, नटराज सातव पाटील, सुनील (चाचा) जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आदी मान्यवर उपस्थित होते.



