दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक/पुणे...
आळंदी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या “ज्ञानोबा ते तुकोबा” या राष्ट्रीय परिषदेतील बीजभाषणात स्वामी गोविंददेव गिरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज,संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या वाङ्मयाबाबत केलेल्या विधानाचा श्री.ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची यांनी जाहीर निषेध नोंदविला आहे.
संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित “ज्ञानोबा ते तुकोबा” राष्ट्रीय परिषदेत स्वामी गोविंददेव गिरी यांनी संतांच्या वाङ्मयाबाबत तौलनिक उद्गार काढताना हे वाङ्मय ग्रंथ नसून भाष्य व संकलन असल्याचा निष्कर्ष मांडला.
या विधानाशी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी पूर्णपणे असहमत असून ते संतपरंपरेच्या विचारांशी विसंगत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,संत ज्ञानेश्वर महाराजांनी सहज, सुंदर, रसाळ आणि अलंकारिक मराठी भाषेत तत्वज्ञानाचे अप्रतिम विवेचन करणारा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ निर्माण केला असून तो मराठी वाङ्मयाचा अमूल्य ठेवा आहे.स्वतः संत ज्ञानदेवांनीच ग्रंथाच्या उपसंहारात “मग आर्ताचेनि वोरसे। गीतार्थग्रंथन मिसे। वर्षला शांतरसे। तो हा ग्रंथुः॥” असे म्हणत ज्ञानेश्वरीचा उद्देश स्पष्ट केला आहे.
तसेच संत नामदेव महाराजांनीही “नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी॥” असे म्हणत ज्ञानेश्वरीचा ग्रंथ म्हणून गौरव केला आहे. संत ज्ञानदेवांनी “अमृतानुभव” हा तत्वचिंतनात्मक ग्रंथ निर्माण करून वैष्णव भक्तीपरंपरेला नवी दिशा दिली.
पुढे संत नामदेवांच्या अभंगरचना,संत एकनाथांनी निर्माण केलेला भागवत ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा हे सर्व संतवाङ्मय केवळ साहित्य नसून जगाच्या कल्याणाचा अमृतस्रोत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्वामी गोविंददेव गिरी यांनी केलेल्या विधानामुळे संतपरंपरेच्या भावनांना ठेस पोहोचल्याची भावना व्यक्त करत संस्थान कमिटीने या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदविला आहे.
तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वामी गोविंददेव गिरी यांना सुबुद्धी द्यावी आणि त्यांनी सकल संतांची क्षमा मागावी,अशी अपेक्षाही संस्थान कमिटीने व्यक्त केली आहे.



