उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
नागपूर : काटोल येथील एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १९ कामगारांचा नाहक बळी गेला,तर २३ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेला कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत,दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील सर्व स्फोटक निर्मिती कंपन्यांचे तात्काळ ऑडिट करावे,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
प्रमुख मागण्या आणि आक्षेप….
१) या घटनेला सर्वस्वी कंपनीचे मालक,संचालक आणि संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२) स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना कंपनी व राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी.
३) पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था (PESO) कडे सुरक्षा देखरेखीची जबाबदारी असतानाही नागपूर जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत आहेत.यावरून ‘पेसो’च्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येतो,त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत.
४) एसबीएल कंपनीत कामगारांना केवळ ३०० रुपये रोज देऊन त्यांच्या जिवाशी खेळ सुरू होता. या प्रकरणाची चौकशी करून कामगारांना ‘मिनिमम वेजेस’ (किमान वेतन) नुसार हक्काची मजुरी मिळावी.
५) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील स्फोटके आणि दारूगोळा बनविणाऱ्या सर्व कंपन्यांचे तातडीने ऑडिट करून सुरक्षा मानकांची खातरजमा करण्यात यावी.
निवेदन सादर करताना शहराध्यक्ष मंगेश वानखेडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष महानंदा राऊत,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध मडके यांच्यासह आनंद चौरे,वैभव येवले,शुभम वाहने,साधना नितनवरे,लता म्हैसकर,मनोज सुटे,तोसीब शेख,विजय गोंडुळे,पवन तागडे, किरण देवरे,कमलेश शंभरकर, शेषराव मेश्राम,ॲड.बी.पी.पानतावणे व विनोद मोहोड आदी उपस्थित होते.
या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने यावेळी दिला आहे.



