दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगावकर यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १ मार्च रोजी फ्रुटवाले धर्मशाळा येथे हा बहुप्रतीक्षित सोहळा उत्साहात पार पडणार असून, धार्मिक कार्यक्रमांसोबत समाजोपयोगी उपक्रमांचीही रेलचेल असणार आहे.
सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याची सुरुवात माऊलींना अभिषेकाने होणार असून त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा, प्रवचन, सत्संग, किर्तन आणि अभंगवाणी यांचे आयोजन करण्यात आले आहे. आध्यात्मिक वातावरणात भक्तीचा सुरेल दरवळ अनुभवता यावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप आणि ग्रंथतुला यांसारखे सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, आ.बाबाजी काळे, मा.आ.दिलीप मोहीते, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासह पंढरपूर, आळंदी व देहू संस्थानांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरही या सोहळ्यास हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजक अजित वडगावकर यांनी दिली. सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आध्यात्मिक उन्नतीसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येणार असून, आळंदीकरांसाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे.



