दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची अचूक आणि सुलभ माहिती मिळावी, यासाठी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे तीन बाय चार आकाराचे फलक दर्शनी भागात लावावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले, शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात; मात्र त्यांच्या माहितीअभावी अनेक पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहतात. ही दरी दूर करण्यासाठी प्रत्येक शाळेने पुढाकार घेऊन योजनांची माहिती सुबोध, स्पष्ट आणि ठळक स्वरूपात प्रदर्शित करावी. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा दर्शनी भागात लावलेले माहितीफलक विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ विद्यार्थी, दोन्ही पालक अपंग असलेले विद्यार्थी तसेच पॉक्सो कायद्यानुसार पीडित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरमहा २२५० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, अशी माहिती देत त्यांनी महिला व बालकल्याण विभागाने नियुक्त संस्थांमार्फत अशा बालकांचा शोध घेऊन परिपूर्ण माहिती सादर करावी, असे निर्देश दिले. जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या प्रकरणांवर कार्यवाही केली जाते. कोरोना काळात सुरू करण्यात आलेली एकल पालक विद्यार्थ्यांसाठीची योजना आता नियमित स्वरूपात सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी व प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्यातील एकूण २ कोटी १५ लाख ३४ हजार १९९ विद्यार्थ्यांपैकी १० लाख ४५ हजार १२५ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित असून ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली.



