दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : शहरातील घनकचरा व्यवस्थापन, इंद्रायणी नदी प्रदूषण, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबित कामे, सिद्धबेट परिसराचा विकास तसेच मैला शुद्धीकरण प्रकल्प या महत्त्वाच्या विषयांवर मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आळंदी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. ही बैठक नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, सत्तारूढ गटनेते सचिन गिलबिले, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे पाटील यांच्यासह नगरसेवक गोविंद कुऱ्हाडे पाटील, सोमनाथ कुऱ्हाडे पाटील, दिनेश घुले, संतोष रासकर, नगरसेविका पुजा घुंडरे पाटील, साक्षी कुऱ्हाडे पाटील, ऋतुजा तापकीर तसेच पुणे जिल्हा भाजपा सचिव किरण येळवंडे, अक्षय कुऱ्हाडे पाटील, अनिकेत तापकीर, संजय घुंडरे पाटील, विवेक घुंडरे पाटील, संकेत कुऱ्हाडे पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येचा आढावा घेत इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, सिद्धबेट विकास आराखड्याला गती द्यावी आणि मैला शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत स्पष्ट दिशा द्यावी, अशी भूमिका मांडण्यात आली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व विषय समजावून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत प्रलंबित कामांबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहेत.



