शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास होत असलेली दिरंगाई त्यांच्यावर अन्याय आहे व त्यांना वेदनातंर्गत पिडा देणारी आहे,असे उपसरपंच अशोक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मौजा शंकरपूर,तालुका चिमूर येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या आहेत.
संबंधित कागदपत्रे सादर करणे,बांधकामाची टप्प्याटप्प्याने पूर्तता करणे,जिओ-टॅगिंग करणे व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.
तथापि,सर्व बाबी पूर्ण करूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे.
याबाबत संबंधित गृह अभियंता यांना विचारणा केली असता “वरच्या स्तरावर सिस्टम मध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे निधी वर्ग करण्यात विलंब होत आहे” असे सांगण्यात आले.
या विलंबामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले असून,काहींची घरबांधणी अपूर्ण अवस्थेत आहे.
मजुरी,बांधकाम साहित्य व इतर खर्च भागविण्यासाठी लाभार्थ्यांना कर्ज काढावे लागत आहे,त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
म्हणून उपसरपंच अशोक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत करून दिले की,संबंधित विभागाशी तातडीने पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रलंबित अनुदानाची रक्कम त्वरित जमा करण्यात यावी,जेणेकरून त्यांची घरबांधणी प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होऊ शकेल.
मुख्य कार्यकारी अधिकारी हे घरकुल अनुदान गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करणार,अशी त्यांच्याकडून नम्र अपेक्षा उपसरपंच अशोक चौधरी यांना आहे.



