Home Maharashtra ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा लढा तीव्र… — मुख्यमंत्री महोदयांना पाठवणार १ लाख...

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा लढा तीव्र… — मुख्यमंत्री महोदयांना पाठवणार १ लाख पत्रे’!.. — ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या सभेत महत्त्वपूर्ण ठराव पारित; २७ फेब्रुवारीला धडक निवेदन…

ऋषी सहारे 

   संपादक 

ब्रह्मपुरी : चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती व्हावी, या मागणीसाठी ‘ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती’ची महत्त्वपूर्ण सभा शासकीय विश्रामगृह येथे हरिचंद्र चोले सर यांच्या अध्यक्षतेखाली तर कॉम.विनोदभाऊ झोडगे मुख्य जिल्हा निमंत्रक ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या सभेला प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत डांगे उपस्थित होते.

         या बैठकीत ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी लोकचळवळ उभी करण्यावर सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

सभेत घेण्यात आलेले ऐतिहासिक निर्णय…

१. लोकशाहीचा जागर :- जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तब्बल १ लाख पत्रे पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

२. ग्रामपंचायत ठराव :-  ग्रामीण भागातील पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने जिल्हा निर्मितीचा ठराव घ्यावा, यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले जाईल.

३. नगर परिषद सहभाग :-  ब्रह्मपुरी नगर परिषदेनेही या मागणीचा अधिकृत ठराव घ्यावा, यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची भेट घेतली जाईल.

४. तालुका निर्मिती :- विद्यमान ब्रह्मपुरी, नागभिड, सिंदेवाही या तालुक्याचे विभाजन करून अधिक तालुके मेंडकी, मुडझा, तळोधी (बाळापुर), नवरगाव ,निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे ठरले.

५. समन्वय व प्रचार :- नागभीड, सिंदेवाही, सावली आणि तळोधी, मेंडकी, मुडझा, गांगलवाडी,नवरगाव, परिसरातील जनतेचा पाठिंबा मिळवून समन्वय साधला जाईल.

६. २७ फेब्रुवारीला तहसीलवर धडक :- येत्या २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे.

          या ऐतिहासिक क्षणी सर्व जिल्हाप्रेमी नागरिकांनी तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

       यावेळी विनोदभाऊ झोडगे, प्रशांत डांगे, शंकरराव उराडे, कोडापे साहेब, प्रा. सुयोग बाळबुद्धे, मनोजभाऊ भूपाल, भगवानजी कन्नाके, सुवर्णा देशमुख मॅडम, ढोमणे सर, झलके साहेब, डॉ. बाळकृष्ण शेळके, विहार मेश्राम, अमोल मोटघरे यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन राजू भागवत सर यांनी केले.

          आता नाही तर कधीच नाही ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे.