दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पिंपरी : इंद्रायणी नदीचे केवळ स्वच्छता अभियानांनी संवर्धन होणार नाही, तर प्रदूषणाच्या मुळावर घाव घालणे अत्यावश्यक आहे, असा ठाम निर्धार मंगळवारी महापौर कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आळंदी नगरपरिषद यांच्यात इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत सविस्तर आढावा बैठक महापौर दालनात पार पडली.
औद्योगिक सांडपाणी, केमिकल्स तसेच सोसायट्यांचे अशुद्ध सांडपाणी इंद्रायणीमध्ये सोडले जाणार नाही, यासाठी कठोर आणि प्रभावी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्या आणि संबंधित घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौर रवि लांडगे यांनी दिला. “नदी स्वच्छ हवी असेल, तर निर्णयही तितकेच कठोर असणे गरजेचे आहे,” असा एकमताने सूर बैठकीत उमटला.
या बैठकीस पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी नगरपरिषदचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे, नगरसेविका ऋतुजा तापकीर, साक्षी कुऱ्हाडे, पुजा घुंडरे, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे, संतोष रासकर, पुणे भाजपा सचिव किरण येळवंडे, विवेक घुंडरे, अनिकेत तापकीर, संजय घुंडरे उपस्थित होते. इंद्रायणी नदीच्या शाश्वत संवर्धनासाठी दोन्ही प्रशासनांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



