Home क्रीडा भैरवनाथ महाराज केसरीवर योगेश्वर तापकीर यांची मोहोर… — आळंदीत रंगला भव्य...

भैरवनाथ महाराज केसरीवर योगेश्वर तापकीर यांची मोहोर… — आळंदीत रंगला भव्य कुस्त्यांचा आखाडा; मानाची गदा देऊन तापकीर याचा सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्त्यांच्या आखाड्यात नामवंत पैलवानांच्या लढतींनी प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. यंदाच्या ‘भैरवनाथ महाराज केसरी’ किताबासाठी झालेल्या अंतिम लढतीत योगेश्वर तापकीर यांनी मुन्ना पटेल यांच्यावर मात करत मानाचा किताब पटकावला.

          अत्यंत चुरशीच्या सामन्यात दोन्ही पैलवानांनी ताकद, चपळाई आणि तांत्रिक कौशल्य यांचे उत्कृष्ट दर्शन घडवले. निर्णायक क्षणी एक महत्त्वाचा १ पॉइंट घेत योगेश्वर तापकीर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम क्षणी झालेल्या या गुणफटक्यामुळे प्रेक्षकांत एकच जल्लोष उसळला.

          विजयानंतर योगेश्वर तापकीर यांना माजी नगराध्यक्ष स्व. दत्तात्रय कुऱ्हाडे यांच्या स्मरणार्थ पै. कार्तिक कुऱ्हाडे यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आळंदी देवस्थानचे चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

        उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कुस्त्यांच्या आखाड्याने पारंपरिक क्रीडा संस्कृतीची परंपरा जोपासत तरुणांना प्रेरणा दिली. प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत रंगलेला हा सोहळा उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला.