उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्राला अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करण्यासाठी देशव्यापी,कायदेशीर आणि शांततापूर्ण आंदोलन उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी या पत्राद्वारे काँग्रेस पक्षाकडे मांडला होता.वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात काही गंभीर व चर्चेतील मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
जेफरी एपस्टाईन फाइल्स”शी संबंधित ई-मेलमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख झाल्याच्या वृत्तांबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.तसेच अमेरिकेसोबत झालेल्या आर्थिक व्यापार कराराबाबतही अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
२०२० मधील चीन-भारत सीमावादादरम्यान झालेल्या संघर्षाच्यावेळी केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली नाही, या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधानांनी देशासमोर सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विरोधकांनी एकत्र यावे….
काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी तसेच इतर भाजपविरोधी पक्ष,एससी, एसटी आणि ओबीसी संघटनांसोबत एकत्र येऊन लोकशाही मार्गाने आंदोलन उभारावे,असा प्रस्ताव आंबेडकर यांनी मांडला आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष….
दरम्यान,काँग्रेस नेतृत्वाकडून या प्रस्तावावर अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. काँग्रेस पक्ष या मागणीवर काय निर्णय घेतो,याकडे राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात लक्ष लागले आहे.


