दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या वतीने महाद्वार नूतनीकरण कामाचा शिलापूजन सोहळा श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला भाविक, वारकरी व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या शुभहस्ते शिलापूजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, आर. के. सी. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर शुभम राजकुमार चव्हाण तसेच उपनगराध्यक्ष सुजाताताई तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महाद्वार नूतनीकरणामुळे भाविकांना अधिक सुरक्षित व सुबक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ, चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा), डॉ. रोहिणीताई पवार तसेच पुरुषोत्तम मुरलीधर पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “महाद्वार हे केवळ प्रवेशद्वार नसून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन स्थळाची ओळख आहे. राज्यातील तसेच देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांचे स्वागत याच द्वारातून होते. त्यामुळे महाद्वाराचे नूतनीकरण हे श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक सुविधांचा सुंदर संगम ठरेल. भाविकांना अधिक सुरक्षित, सुबक आणि शिस्तबद्ध व्यवस्था मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.”
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे महाद्वार नूतनीकरणाच्या या कामामुळे श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुबक आणि भाविकांसाठी सोयीस्कर होणार असल्याची भावना नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी यावेळी व्यक्त केली.



