Home Social आळंदी देवस्थानवर नगराध्यक्षांची पदसिद्ध सदस्य नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर…

आळंदी देवस्थानवर नगराध्यक्षांची पदसिद्ध सदस्य नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : तीर्थक्षेत्र विकास कामांना गती देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी वर नगराध्यक्षांची पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नगरपरिषद सभागृहाने एकमताने मंजूर केला. या निर्णयामुळे संस्थान व नगरपरिषद यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणार असल्याचे मानले जात आहे.

         आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत शहरात भक्तनिवास, इंद्रायणी नदी घाट विकास, पायाभूत सुविधा उभारणी यांसारखी कामे सुरू आहेत. शासनाकडून प्राप्त होणारा निधी भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी वापरण्यात येत आहे.

         लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्षांचे संस्थान कमिटीवर प्रतिनिधित्व असणे आवश्यक असल्याची भूमिका सभागृहात मांडण्यात आली. या नियुक्तीमुळे विकासकामांना गती मिळून तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सभागृहाने सदर ठरावास सर्वानुमते मंजुरी दिली.