Home देशविदेश चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग,प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित…

चाकणमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बसला आग,प्रसंगावधान राखल्याने ५० प्रवासी सुरक्षित…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

    पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी सकाळी एका धावत्या PMPML इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

         बसचालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ५० प्रवासी सुखरूप बचावले असून,मोठी जीवितहानी टळली आहे.

नेमकी घटना काय?

      मिळालेल्या माहितीनुसार,ही बस चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांना घेऊन आपल्या मार्गावरून जात होती.सकाळी बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली असताना अचानक बसच्या मागील बाजूने धूर येऊ लागला.

         काही कळण्याच्या आतच धुराचे लोट वाढले आणि बसने पेट घेतला.बसमध्ये धूर दिसताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला थांबवली. 

          वाहकाने तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सुरुवात केली.बसमधील सर्व ५० प्रवासी सुरक्षितपणे खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली.

       घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.या घटनेमुळे चाकण परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

        सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली,तरी सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. 

          विशेष म्हणजे,सार्वजनिक बसना आग लागण्याच्या घटना आता अपवाद न राहता सातत्याने घडत आहेत.ज्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

       या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण असून,प्रशासन याकडे गांभीर्याने का पाहत नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

       यावर प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलून बसची देखभाल आणि तांत्रिक तपासणी कडक करावी,अशी मागणी जोर धरत आहे.