Home Social नगरसेवक सुनिल घुंडरे यांच्या सुचनेनंतर धोकादायक डीपीला एका तासात झाकण…

नगरसेवक सुनिल घुंडरे यांच्या सुचनेनंतर धोकादायक डीपीला एका तासात झाकण…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : येथील चाकण रोडवरील नगरपरिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी उघड्या अवस्थेत असलेल्या वीज वितरण पॅनल (डीपी) मुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या धोकादायक परिस्थितीकडे स्थानिक नगरसेवक सुनिल घुंडरे यांनी तत्काळ लक्ष वेधत प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनंतर अवघ्या एका तासात संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत डीपीला सुरक्षित झाकण बसविले.

         शाळा परिसरात लहान मुले ये-जा करत असल्याने उघडी डीपी ही संभाव्य अपघाताला आमंत्रण देणारी ठरत होती. नागरिक आणि पालकांमध्ये याबाबत चिंता व्यक्त होत होती. ही बाब समजताच नगरसेवक सुनिल घुंडरे यांनी वीज वितरण विभागाशी थेट संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रशासनानेही तत्परता दाखवत कर्मचाऱ्यांना त्वरित पाठवून डीपीला मजबूत झाकण बसविले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला असून पालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

          यावेळी बोलताना नगरसेवक सुनिल घुंडरे म्हणाले, “शाळा परिसर हा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. उघडी वीज डीपी ही गंभीर दुर्घटनेचे कारण ठरू शकली असती. नागरिकांकडून माहिती मिळताच मी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधला. प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाही केली, याबद्दल त्यांचे आभार. भविष्यात अशा धोकादायक बाबी आढळल्यास नागरिकांनी तत्काळ कळवावे; सुरक्षित आळंदी हे आपले सामूहिक ध्येय आहे.”