अमान कुरेशी
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
नगरपंचायत सिंदेवाही–लोणवाही नगरपंचायतच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून शहरात भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाला सिंदेवाही तालुक्यातील विविध शासकीय व सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कृषी विभाग, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वनविभाग, महावितरण, नगरपंचायत, आयटीआय कॉलेज, सर्वोदय शाळा, शासकीय रुग्णालय कर्मचारी, पत्रकार संघटना तसेच व्यापारी युनियन संघटनांच्या टीम्सना या स्पर्धेत आमंत्रित करण्यात आले होते.
या सर्व टीम्सनी आपापल्या कर्मचाऱ्यांसह जिद्द, चिकाटी व संघभावनेचे दर्शन घडवत विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवला. विशेषतः सिंदेवाही पोलीस स्टेशनने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक खेळांमध्ये विजय मिळवून क्रीडा महोत्सवावर आपली मोहोर उमटवली. पुरुष व महिला रस्सीखेच, पुरुष व महिला धावण्याच्या शर्यती तसेच महिला क्रिकेट अशा पाच ते सहा खेळांमध्ये पोलीस टीमने प्रथम पारितोषिक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तालुकाभरातून सिंदेवाही पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक श्री. कांचन पांडे यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या पुरुष क्रिकेट टीमने प्रथम पारितोषिक पटकावले, तर व्यापारी असोसिएशन संघटनेने व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व विजयी संघांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात आले.
विजेत्या संघांना बक्षीस वितरणासाठी माजी मंत्री तथा आमदार व लोक लेखा समितीचे अध्यक्ष श्री. विजय वड्डेट्टीवार आणि नगराध्यक्ष श्री.भास्कर नन्नावार यांच्या हस्ते चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
दरवर्षी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांचे सहभागी टीम्सकडून आभार मानण्यात आले. क्रीडेमुळे एकोपा, आरोग्य व सामाजिक सलोखा वाढीस लागतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


