युवराज डोंगरे
उपसंपादक
दर्यापूर तालुका विधि सेवा समिती व दर्यापूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर्यापूर येथिल प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश सत्यवान डोके उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आद्यशिक्षीका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शिक्षण संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमेचे पुजन करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबीराचे प्रास्ताविक ॲड.जगदीश विल्हेकर यांनी केले.त्यांनी सदर शिबीर घेण्याचा उद्देश सांगितला. तसेच शिक्षण घेवुन व अभ्यास करून मोठ्या पदावर जावे असे सांगितले. तसेच सोशल मिडियाच्या नादाला लागुन आपले नुकसान करुन घेवु नका असा उपदेश दिला.
शिबीरामध्ये ॲड.उषा अग्रवाल यांनी आजच्या काळातील बालिकांसमोरील आव्हाने व शिक्षणाचा प्रसार या विषयावर मार्गदर्शन केले.ॲड. लिना गहेरवाल यांनी लैंगिक असमानता संपुष्टात आणने कसे गरजेचे आहे. या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड.आम्रपाली चौरपगार यांनी समाजातील स्त्रियांचे स्थान व कायद्यातील तरतुदी या विषयावर मार्गदर्शन केले.
न्या. सत्यवान डोके यांनी अध्यक्षिय भाषणामध्ये मुलींनी आपले ध्येय निश्चित करावे व ध्येयप्राप्तीसाठी परिश्रम घेण्याचे विद्यार्थिनींना आवाहन केले. विद्यार्थिनींनी समाजात वावरताना कोणी जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर अशी घटना सहन करु नका व ताबडतोब त्याबाबत आपले पालक किंवा शिक्षक यांना सांगा किंवा पोलीसांकडे तक्रार करा कारण आपण ते सहन केले तर त्रास देणाराचे मनोबल वाढत जाते असे सांगीतले.
शिबीरासाठी दर्यापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र आठवले, गटविकास अधिकारी सी. जे. ढवक, जेष्ठ विधिज्ञ ॲड. संतोष धर्माधिकारी, ॲड. दिलीप अग्रवाल, ॲड. संतोष कोल्हे, ॲड. जे. व्ही. नळकांडे, ॲड. एस. पी. गाडे व ॲड.आदित्य धर्माधिकारी हे उपस्थित होते.
प्रबोधन विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र गोंडाने यांनी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केला तसेच उपस्थितांचे आभार मानले. तसेच मुलिंसाठी अशा प्रकारचे कायदेविषयक जनजागृतीपर शिबीरे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यालयाचे अध्यापक निखिल बुंदेले यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. या कायदेविषयक शिबीरामध्ये विद्यालयाचे सर्व अध्यापक वृंद तसेच दोनशेहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर शिबीराचे यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी विनोद गवई, अभिजीत धांडे व आकाश कौलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.



