Home Social ग्रामगीता महाविद्यालय चिमूरच्या रासेयो शिबिराचे मालेवाडा येथे उद्घाटन…

ग्रामगीता महाविद्यालय चिमूरच्या रासेयो शिबिराचे मालेवाडा येथे उद्घाटन…

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी

चिमूर :- सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित युवा जनजागृती व श्रमसंस्कार सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन मालेवाडा येथे उत्साहात पार पडले. 

           “सशक्त युवा – सशक्त भारत” या संकल्पनेवर आधारित या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बिजनकुमार शिल यांनी केले.त्यांनी शिबिराचे महत्त्व,उद्दिष्टे व संपूर्ण रूपरेषा स्पष्ट करत शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व सेवाभाव निर्माण होतो,असे प्रतिपादन केले.

         उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले होत्या.अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या सेवाभावी कार्यावर प्रकाश टाकला.

         शिबिराच्या उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.शुभांगी वडस्कर,आठवले समाजकार्य महाविद्यालय,चिमूर यांनी मार्गदर्शन करताना ग्रामस्वच्छतेतून सेवा करणे हे राष्ट्रीय कार्य असून स्वयंसेवकांनी त्याचा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन केले. 

           यावेळी मालेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच कालिदासजी भोयर यांनीही स्वयंसेवकांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ.चंद्रभान खंगार,डॉ.प्रीती दवे,उपसरपंच शंकर दडमल,पोलीस पाटील हेमंत गजभिये,मुख्याध्यापक गुलाब पंधरे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रवीण जीवतोडे,गुरुदेव सेवा मंडळाचे केशव पोईनकर,ग्रामसेवक राजेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो स्वयंसेविका कु.प्राची मंगर तर आभार प्रदर्शन रा.से.यो.स्वयंसेविका कु. लावण्या धोटे यांनी केले.

           या सात दिवसीय रासेयो शिबिरात प्राणायाम,ध्यान व योगासने,ग्राम स्वच्छता व जलसंवर्धन जनजागृती रॅली,आरोग्य व रक्तदान शिबिर,आपत्ती पूर्वतयारी व व्यवस्थापन,व्यक्तिमत्त्व विकास,श्रमदान,जलसंवर्धन पथनाट्य,पशुचिकित्सा शिबिर,मानव–वन्यजीव संघर्ष,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच विविध बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

             उद्घाटन कार्यक्रमास मालेवाडा येथील ग्रामवासी,ग्रामगीता महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.