दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी — श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्तपदी डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थानच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विश्वस्त योगी निरंजननाथ, ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहिणी पवार उपस्थित होते.
डॉ.भावार्थ महाराज देखणे हे संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार तसेच सामाजिक – धार्मिक क्षेत्रातील कार्यासाठी परिचित आहेत. तसेच त्यांनी पालखी सोहळा प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांनी आजवर कीर्तन, प्रवचन, भारुड, अध्यात्मिक प्रबोधन तसेच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थानच्या कार्यास निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
प्रमुख विश्वस्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ.भावार्थ महाराज देखणे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार, वारकरी संप्रदायाची परंपरा जपणे तसेच संस्थानच्या विकासासाठी सर्व सहकारी विश्वस्तांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.



