रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) पथकाच्या वतीने दिनांक १६ ते १७ जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता.
या प्रसंगी रासेयो स्वयंसेवकांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून वाहन न चालवणे आदी विषयांवर जनजागृती केली. महाविद्यालय परिसरात व आसपास जागृती फलक, घोषवाक्ये, तसेच शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काही स्वयंसेवकांनी नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले.
या उपक्रमाला प्रभारी कार्यकारी प्राचार्य डॉ. पितांबर पिसे यांनी मार्गदर्शन केले.अतिथी म्हणून विद्यार्थी विकास विभागाचे प्रा.डॉ.नितिन कत्रोजवार होते.रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रफुल राजुरवाडे प्रा.डॉ.राजेश्वर राहागंडाले यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. रस्ते सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे संदेश या सप्ताहातून देण्यात आले.



