दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांची रचना तसेच विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी उद्या (शुक्रवार, दि. २३) विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सकाळी अकरा वाजता आळंदी नगरपरिषद सभागृहात होणार आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ६४, ६५ व ६६ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक) नियम, २००६ अन्वये ही विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेमध्ये स्थायी समिती व विषय समित्यांवरील सदस्यांचे नामनिर्देशन, तसेच विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या ४ व २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम–२०२५ अंतर्गत नवनिर्वाचित अध्यक्ष व नगरसेवकांची नावे २३ डिसेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अधिनियमातील तरतुदींनुसार स्थायी व विषय समित्यांची रचना करणे आवश्यक असल्याने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
विशेष सभेत विषय समित्यांची संख्या व सदस्यसंख्या निश्चित करण्यात येणार असून, उपाध्यक्ष कोणत्या विषय समितीचे पदसिद्ध सभापती असतील हे ठरविले जाणार आहे. तसेच उर्वरित विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार असून, आवश्यक असल्यास निवडणूक प्रक्रिया राबवून निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर स्थायी समितीची रचना घोषित केली जाणार आहे.
या विशेष सभेसाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली अधिनियम व नियमांनुसार संपूर्ण कार्यवाही पार पडणार आहे.



