युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर ते दहीहांडा या मुख्य मार्गावर कंत्राटदाराने सुरू केलेल्या बोगस पॅचवर्कच्या कामाला शिवसेना (उबाठा) ने दणका दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते व युवानेते नितेश गावंडे यांनी या भ्रष्टाचाराचा व्हिडिओ काढून भांडाफोड केल्यानंतर आमदार गजानन लवटे यांनी ‘शिवसेना स्टाईल’मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “जनतेच्या जिवाशी खेळाल, तर गाठ आमच्याशी आहे,” असा सज्जड दम यावेळी देण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून दर्यापूर दहीहांडा रोडच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त होते. यावर उपाय म्हणून सुरू असलेले पॅचवर्क म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे नितेश गावंडे यांच्या पाहणीत समोर आले.
डांबराचा लवलेशही नसलेले हे काम नितेश गावंडे यांनी चक्क हाताने उखडून दाखवले.शिवसेना स्टाईलने हा भ्रष्टाचार आम्ही उखडून टाकू असा इशारा देत त्यांनी कंत्राटदाराची पोलखोल केली. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून आमदार गजानन लवटे यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन रस्त्यावर उतरले. पाहणी दरम्यान कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे दिसताच आमदारांनी अधिकाऱ्यांना भर रस्त्यात सर्वांसमोर चांगलेच झापले.
भ्रष्ट कंत्राटदारांचे लाड पुरवणे बंद करा अन्यथा शिवसेनेचा हिसका दाखवावा लागेल अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. संबंधित कंत्राटदाराचे बिल तात्काळ रोखून त्याचे सर्व परवाने रद्द करण्याचे आणि त्याला काळ्या यादीत लिस्ट’मध्ये टाकण्याचे आदेश त्यांनी दिले.
शिवसेना स्टाईल इशारा…
“आमच्या तालुक्यात जनतेच्या पैशांची लूट चालू देणार नाही. कंत्राटदाराने तात्काळ दर्जेदार काम पुन्हा सुरू करावे, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने त्याला धडा शिकवेल,” असा थेट इशारा आमदार गजानन लवटे व नितेश गावंडे यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र दिपटे,विकास येवले, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर,युवासेना उपशहरप्रमुख दिपक बगाडे, सामाजिक कार्यकर्ते नितेश गावंडे, इंजि.यश लवटे यांच्यासह शिवसेना युवासेनेचे आजी – माजी पदाधिकारी व संबधित अधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.



