शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकातंर्गत कृषी सौर पंप योजनेतील प्रलंबित असलेले अर्ज मंजूर करण्याबाबत आवश्यक भुमिका अंतर्गत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मंजूर करण्याची मागणी महावितरणचे कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता चिमूर यांच्याकडे मौजा शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कृषी सौर पंप चे प्रस्तावित अर्ज ३० जानेवारी पर्यंत मंजूर करण्याची कार्यवाही न झाल्यास दि.०६ फेब्रुवारी २०२६ रोजी चिमूर येथील विद्युत विभाग परिसरात एक दिवसाचे शांततामय उपोषण करण्याबाबत पूर्वसूचना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे की,चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी सौर पंप योजनेतील अत्यंत गंभीर व दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले नसल्याने शेतकरी परेशान त्रस्त झाले आहेत.
कृषी सौर पंप योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करून महावितरणकडे अर्ज सादर केलेले आहेत.आवश्यक कागदपत्रे,जागा तपासणी,तांत्रिक सर्वेक्षण तसेच शासन निर्धारित शुल्क भरणा इत्यादी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत.
तरीसुद्धा गेल्या एक ते दीड वर्षांपासून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसविण्यात आलेले नाहीत.
तद्वतच या कालावधीत कोणतीही अंतिम मंजुरी स्पष्टपणे देण्यात आलेली नाही,सौर पंप स्थापनेचे कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही,तसेच शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतीस कोणतेही ठोस,लेखी व अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही.
उपसरपंच अशोक चौधरी यांनी स्वतः,तसेच शेतकऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत विभागाशी दूरध्वनीद्वारे,प्रत्यक्ष भेटीद्वारे व लेखी पत्रव्यवहारातून सातत्याने कृषी सौर पंप योजना बाबत पाठपुरावा केला आहे.
मात्र,विभागाकडून केवळ टाळाटाळ,दिशाभूल व जबाबदारी झटकण्याची भूमिका सातत्याने अनुभवास आलेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.
कृषी सौर पंप योजना ही शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाची व जीवनावश्यक योजना आहे.पिकांचा हंगाम,उत्पादन व उत्पन्न या सर्वांचा थेट संबंध या योजनेशी आहे.
अशा परिस्थितीत होणारा हा विलंब म्हणजे शेतकऱ्यांच्या भविष्यासोबत थेट अन्याय करतो आहे.
म्हणूनच निवेदनाद्वारे उपसरपंच अशोक चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की,जर दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत चिमूर तालुक्यातील प्रलंबित कृषी सौर पंप प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष सौर पंप बसविण्याची कार्यवाही सुरू झाली नाही,अथवा ठोस व लेखी स्वरूपात निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही,तर शेतकऱ्यांच्या वतीने दि.०६ फेब्रुवारी २०२६ रोजी चिमूर येथील विद्युत विभागाच्या परिसरात एक दिवसाचे शांततामय उपोषण करण्यात येईल.
सदर उपोषण हे पूर्णतः शांततामय,कायदेशीर व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य केले जाणार नाही असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित विभागाच्या विलंबित व निष्क्रिय भूमिकेवर राहील असे उपसरपंच अशोक चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
निवेदनाच्या प्रती ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,प्रधान सचिव,ऊर्जा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,व्यवस्थापकीय संचालक, महावितरण (MSEDCL), मुंबई,विभागीय आयुक्त,नागपूर विभाग नागपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,अधीक्षक अभियंता महावितरण चंद्रपूर परिमंडळ,कार्यकारी अभियंता महावितरण चिमूर विभाग,तहसीलदार चिमूर,पोलीस निरीक्षक चिमूर पोलीस स्टेशन,यांना पाठविण्यात आल्या आहेत.



