ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – तालुक्यातील जांभळी–नाळेवाही दवंडी रस्त्यावरील नाल्यावर मागील १४ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असलेला पुलिया आजही नागरिकांच्या जीवितास धोका ठरत आहे. या पुलियाचे काम अपूर्ण राहिल्यामुळे पावसाळ्यात नाला भरून वाहतो आणि शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर समस्येची आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष नाळेवाही अर्धवट पुलास भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांच्या समोर आपली व्यथा मांडत, शासन व प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल सुमारे १४ वर्षांपूर्वी मंजूर झाला होता, मात्र आजपर्यंत तो पूर्ण करण्यात आलेला नाही. २०२२ च्या पावसाळ्यात या नाल्याला मोठा पूर आल्याने सुमारे १०० नागरिक अडकले होते, त्यावेळी ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून दोर, काठ्या व उपलब्ध साहित्याच्या मदतीने नागरिकांची सुटका केली होती. अशा घटना वारंवार घडत असतानाही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
या पुलियामुळे जांभळी, दवंडी व परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी येतात, विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होते, तर आजारी रुग्णांना वेळेवर उपचारासाठी नेणे कठीण बनते. पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे बंद होतो.
पाहणी दरम्यान आमदार रामदास मसराम यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पुलियाचे काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. “१४ वर्षे हा खूप मोठा कालावधी असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ही बाब आहे. यापुढे कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
परिसरातील नागरिकांनी आमदार मसराम यांच्या पाहणीमुळे आशा व्यक्त करत, पुलियाचे काम तातडीने पूर्ण होऊन कायमचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी केली आहे.
त्या प्रसंगी उपस्थित काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे , आदिवासी सेल काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष विश्वेश्वर दर्रो, जांभळी सरपंच अनंती पदा, जांभळी उपसरपंच प्रकाश कुंभरे, जानुजी हलामी, स्वप्निल ताडाम उपस्थित होते.



