दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : नगरपरिषद कार्यालयातील विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. १९) नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी बोलावलेली नियोजित बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. नगरपरिषद कार्यालयातील विभागप्रमुख व मुख्याधिकारी यांना जिल्हा परिषद निवडणूक ड्युटी लागल्याने नगराध्यक्षांच्या परवानगीने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
आळंदी नगरपरिषद निवडणूक नुकतीच २ डिसेंबर रोजी पार पडली असून, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासह २१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर मंगळवारी (ता. १३) उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी सर्वसाधारण सभा झाली. नव्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर नागरी प्रश्न, प्रशासकीय कामकाजाचा आढावा तसेच विकासकामांबाबत नगरसेवकांचे प्रस्ताव जाणून घेण्यासाठी सोमवारी नगरपरिषद कार्यालयातील सर्व विभागप्रमुख व मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र, बैठकीच्या आदल्या दिवशीच सर्व नगरसेवकांना बैठक रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. सुधारित बैठकीची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असा निरोपही नगरसेवकांना पाठविण्यात आला.
याबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नगरपरिषद कार्यालयातील सात विभागप्रमुख आणि तीन कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत. त्यामुळे नगरसेवकांना विविध विभागांची सविस्तर माहिती देताना अडचणी निर्माण झाल्या असत्या. सर्व विभागप्रमुख उपस्थित असणे आवश्यक असल्याने ही बैठक काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.



