रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर विधानसभा क्षेत्रातील नगरपंचायत भिसी येथे आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.त्या अनुषंगाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.
या ठिकाणी माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नगरपंचायत भिसी येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतुल पारवे, उपाध्यक्ष किशोर मुंगले यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या सत्कार व पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बोलताना माजी खासदार डॉ.अशोक नेते म्हणाले की, “पुढील पाच वर्षांचा कालावधी आपल्याला जनतेच्या सेवेसाठी लाभला आहे. प्रत्येक प्रभाग व वार्डात प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे. नागरीकांच्या अडीअडचणी, समस्या प्रामाणिकपणे समजून घेऊन त्यांचे निराकरण करावे.
शासनाच्या जनकल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जनतेचे कल्याण हेच अंतिम ध्येय समजून काम करावे.” असे मार्गदर्शन करत त्यांनी सर्व नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भिसीचे गटनेते पंकज गाडीवार, नवनिर्वाचित नगरसेवक अल्का बन्सोड, यशविना ढोंबरे, सारिका सोनकुसरे, बादल जांबुळे, मीरा ढोंबरे, अमन शिवरकर, वृंदा खडसंग यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपंचायत भिसी येथे झालेल्या या पदग्रहण व सत्कार सोहळ्यामुळे नव्या नेतृत्वाला प्रेरणा मिळाली असून, आगामी काळात विकासाभिमुख व लोकहिताच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



