Home Maharashtra नागपूर, भंडारा नंतर ईडी ची नजर चंद्रपूर जिल्ह्यावर अपेक्षित….  — अती...

नागपूर, भंडारा नंतर ईडी ची नजर चंद्रपूर जिल्ह्यावर अपेक्षित….  — अती तिथे “माती” नव्हे,अती तिथे”रेती”? 

  रोखठोक

प्रा.महेश पानसे…

     “अती तिथे माती” ही प्रचलीत म्हण नाईलाजाने बदलण्याची वेळ आलेली दिसते. मातीची जागा आता ‘रेती’ ने घेतलेली दिसते. गौण खनिज असलेल्या रेतीतून महसूल मिळविण्यासाठी शासनाने रेती घाट तयार केले. करोडो मध्ये खाटांचे लिलाव झाले. पुर्वी म्हणायचे ‘रेतीचे कण रगडता तेलही गळे’आता ‘रेतीचे कण रगडता पैसाही गळे ‘याचा असा शोध व अर्थ रेती चोरांनी लावला आहे. 

          रेतीमाफीयांनी नद्या,नाले लुटून वारेमाप पैसा जमविला. शासनाचा महसूल तळाला लागला मात्र रेतीतून अमाप पैसा चोरट्यांच्या गळाला लागला. राज्यात रेती चोरीतून हत्या झाल्यात, टोळीयुद्ध सुरू झालेत.शहाणे उपाशी तर रेती चोर खातात तुपासी असे बोलले जाऊ लागले. 

            रेती चोरीचा पैसा राजकारणात आला.याची अडवा त्याची जिरवा हे धोरण रेती चोरीतून पुढे आले.रेतीचोरी मूळे सर्व सामान्य जनतेला रेती साठी वणवण भटकावे लागत आहे.सर्व सामान्य नागरिकांचे छत्र रेती अभावी स्वप्नातच विरत आहे. 

         राज्याचे दबंग, अभ्यासू भा.ज.पा.नेते, माजी मंत्री आ.मुनगंटीवार यांनी विधानसभेत या भामटेगिरीवर मार्मिक आवाहन केले. रेती ने आता अती केले आहे ही चर्चा गल्ली ते दिल्ली सुरू आहे. म्हणून तर ईडी सक्रिय झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ईडी ने नजर फिरवली तर अती तिथे ‘माती’ नव्हे तर इथे अती तिथे ‘रेती’ ही नवी म्हण रूढ झाली असल्यावर शिक्कामोर्तब होईल अशी कोपरखळी जाणकार मारताना दिसतात.राज्यात रेती धोरण जाहीर केले गेले. 

         सर्व सामान्य नागरिकांना हायसे वाटले की आता रास्त दरात रेती उपलब्ध होईल मात्र रेती धोरणा नंतरचे घटनाक्रम बघता व चार दिवसाआधी नागपूर, भंडारा जिल्ह्यातील ईडी ची कारवाई बघता रेती धोरणाचा कांगावा रेतीचा गोरख धंदा वाढविण्यासाठी तर नव्हता ना अशी शंका व्यक्त झाली. चंद्रपूर जिल्ह्यात ईडीने कारवाई करून बघावी या शंकेवर शिक्कामोर्तब होणार आहे. 

 ******

जिल्ह्यात सर्वदूर ‘रेतीचीच चर्चा…                        

        आजकाल चंद्रपूर जिल्ह्यात जरा “माती” पेक्षा “रेती” ची चर्चा सगळीकडे जोरात असते. रेती चे भाव ऐवढे वधारले की आधी मातीत राबणाऱ्या शेकडो बैल-गाडया आता ‘रेती’ कामात व्यस्त आहेत. ”अती तिथे रेती” ही म्हण आता प्रचलित होत आहे म्हंटल्यास नवल नसावे. 

             चंद्रपूर जिल्ह्यात आधी 58 घाट रेतीने संपन्न होते. प्रत्येक घाटाचा स्वतंत्र लिलाव व्हायचा व जिल्ह्यातील ठेकेदार मंडळी यावर कब्जा करायची. इथूनच खऱ्या अर्थाने रेती चोर, रेती तस्कर, रेतीमाफीया तयार झालेत. महसूल विभाग, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस विभाग, आर. टी. ओ. हे सारे गौण खनिजांचे रक्षक रेती चोरांचे रक्षक बनले. अमाप रेतीचोरीने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला, शासनाचा अमाप महसूल बुडाला मात्र रेतीचोर, माफियांनी व त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारेमाप कमाई केली. 

         चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील रेती संपुर्ण विदर्भ व विदर्भाबाहेर पाठविली जाते. याचाच अर्थ सरळ आहे की किती माल लिलाव झाला? व कितीअधिक उपसा झाला? हे जनतेला समजले पण डोळयात रेती गेलेल्या संबधित विभागाने समजूनही उमजू दिले नाही. 

           हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याचे भा.ज.पा. चे दिग्गज नेते माजी मंत्री आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला या संबधाने तंबी दिली होती. आपला लोकसभेतील पराभव रेती माफियांना केल्याचा खळबळजनक आरोपही केला होता हे सर्वश्रुत आहे. आ.मुनगंटीवार यांनी या आरोपातून जिल्ह्यातील एका स्वपक्षीय आमदाराकडे बोट दाखविण्याची चर्चा रंगली होती. 

         मातीची नव्हे तर आता “रेती” ची चर्चा राजकारणातही जरा जास्त सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाट यंदा एकत्रीतपणे भा.ज.पा. च्या पाॅवरफुल असलेल्या मंत्र्याच्या प्याद्याला दिल्याची चर्चा राहीली. 

 यातील ब्रम्हपूरी, मूल व सावली तालुक्यातील काही घाट कांग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या समर्थक ठेकेदार व रेतीमाफियाला दिल्याची चर्चा राहीली आहे. 

         चर्चेत असलेली मोठया पक्षांतील दबंग नेत्यांची ही रेतीचोर सेना गत नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत लय पैसा उडवताना दिसली.अनेक रेती चोर आपल्या बायका – पोरांना पुढ्यात आणताना दिसली. जिल्ह्यापरीषद व पंचायत समिती करीता ही मंडळी जनसेवक म्हणवून दिमाखात मिरवत असल्याचे चित्र आहे. 

            नागपूर, भंडारा जिल्ह्यात ईडी ने रेती चोर नेत्यांची लबाडी पुढे आणली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ईडीने हात घातला तर गत पंधरा वर्षात या रेतीमाफियांनी किती माल सुतला हे लक्षात येईल. अशी मंडळी आता निवडणुकांमध्ये मोठा खर्च करून राजकारणात पाय पसरतील तर मात्र रेती धोरण रेतीमाफियांसाठी की सर्व सामान्य नागरिकांसाठी? हा सवाल अधिक उग्र होणार असल्याचे बोलले जाते. 

    रेती धोरण आले मात्र घर बांधकामासाठी जनतेला रेती मिळत नाही. रेतीमाफियांचा मात्र टि.पी. व राॅयल्टी चा ” डि माल” चालतो व रेती घाटांची ऐशीतैशी करून चोरलेले गौण खनिज मात्र खुलेआम वाहतूक होते यालाच म्हणतात ” अती तिथे रेती”.