ऋषी सहारे
संपादक
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची आजाद समाज पार्टी गडचिरोली टीम सोबत झालेली भेट व चर्चेच्या फोटो मीडिया वर वायरल झाल्याने ही भेट केवळ औपचारिक म्हणावी की येणाऱ्या राजकीय समीकरणांची तयारी अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
विशेष म्हणजे ही भेट जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर झाल्याने, आजाद समाज पार्टीबाबत नवे तर्क-वितर्क मांडले जात आहेत. बसपा प्रमाणे कॅडर बेस, वैचारिक आंबेडकरी लाईन असलेली आणि भांडवलशाही राजकारणाच्या विरोधात ठाम उभी असलेली आजाद समाज पार्टी, आगामी निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार? हा प्रश्न आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे वरिष्ठ नेते असलेल्या धर्मराव बाबा आत्राम यांच्यासोबतची ही भेट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, “आजाद समाज पार्टी स्वतंत्र वाटचाल करणार की एखाद्या नव्या राजकीय प्रयोगाची तयारी सुरू आहे?” अशा चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. नुकताच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून विविध आंबेडकरी पक्ष एकत्र येऊन लढले परंतु पाहिजे तसे यश संपादन करता आले नसल्याने आसपा काही वेगळे पाऊल टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या भेटीबाबत पक्षाचे नेते विनोद मडावी व राज बन्सोड यांच्याशी मीडियाने चर्चा केली असता, त्यांनी याला सुरजागड यात्रेच्या निमित्ताने झालेली स्नेह भेट असे स्पष्ट केले.
“धर्मराव बाबा हे गेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजप विरोधात ठामपणे उभे होते. त्यामुळे त्यांच्यासोबत संवाद साधण्यात गैर काहीच नाही,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, “जिल्हा परिषद निवडणुकीत कोणासोबत जायचे, कोणासोबत नाही – हे योग्य वेळी स्पष्ट होईल,”असे सूचक विधान करून विनोद मडावी यांनी चर्चांना अधिकच धार दिली आहे.
या भेटीदरम्यान आजाद समाज पार्टीचे युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड,मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार यांची उपस्थितीही अनेक राजकीय संकेत देणारी मानली जात आहे. ही केवळ सौजन्य भेट की बदलत्या राजकीय गणितांची सुरुवात?
याचे उत्तर मात्र येणाऱ्या दिवसांत आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीतच स्पष्ट होणार आहे तोपर्यंत गडचिरोलीच्या राजकारणात तर्क-वितर्कांचा खेळ सुरूच राहणार!



