अबोदनगो.एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी चिखलदरा
चिखलदरा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर यांचा पदग्रहण समारंभ नगरपरिषद प्रांगणात मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या समारंभास शेकडो नागरिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संत-महात्मे उपस्थित असल्याने संपूर्ण परिसर जनसागराने फुलून गेला होता.
या ऐतिहासिक सोहळ्यास खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार राजकुमार पाटील, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह महेंद्रसिंह गहेलवाल, रोहित पटेल, पंकज मोरे, सहदेव बेलकर, राहुल येवले, शेख झहीर, नासिर भाई, नगरसेवक रुपेश चोबे, शैलेश पाल, प्रमोद नाईक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. जनतेने धनशक्तीला चोख उत्तर दिले :- वानखडे…
यावेळी बोलताना खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“चिखलदऱ्यातील जनतेने धनशक्तीला नाकारत जनशक्तीचा दणदणीत विजय घडवून आणला आहे. हा विजय सामान्य नागरिकांचा असून, तो लोकशाहीचा विजय आहे. चिखलदऱ्यातील पाणीपुरवठा, रस्ते, पर्यटन विकास यासाठी ठोस आणि परिणामकारक प्रयत्न केले जातील. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहराच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास कधीही तुटू दिला जाणार नाही,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.
चिखलदऱ्यात सत्ता प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त करताना खासदार वानखडे भावूक झाले.
“माझे पाय कधीच थिरकले नाहीत; मात्र चिखलदऱ्यात विजय मिळाल्यानंतर आनंदाने मी प्रथमच थिरकलो,” असे ते म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास :- नगराध्यक्ष हैदर…
नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“चिखलदऱ्यातील सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. चिखलदऱ्याचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा व पर्यटन विकासासाठी प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने काम केले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पदग्रहणानंतर रक्तदान; सामाजिक जाणिवेचे दर्शन…
पदग्रहण समारंभानंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण सादर केले. या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त झाली.



