रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- माणूस संवेदना घेऊन जन्माला येतो. नंतर त्याच्यात संवेदनशीलता निर्माण होते.दुःखाची बातमी मिळाल्यावर मनाला कळवळा निर्माण झाला पाहिजे. ती संवेदनशीलता. संवेदनशीलता मनाशी संबंधित आहे.संवेदनेचा संबंध फक्त शरीराशी आहे.समोरच्या माणसाला दुःख झाले तर त्या दुःखाच्या निराकरणासाठी माणसाच्या मनात विचार आले तर तिला आपण चेतना म्हणतो.जेव्हा माणसात सामाजिक चेतना निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थाने एका सुदृढ समाज व्यवस्थेची निर्मिती होते.ज्यांच्या मनात खऱ्या अर्थाने चेतना जागृत आहे अशा व्यक्तीमत्त्वांना सामाजिक चेतना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध विधीज्ञ ऍड. भूपेश पाटील यांनी केले.
वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक चेतना पुरस्कार शिक्षण,सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे संजय बोधे, समता सैनिक दलाच्या माध्यमातून सामाजिक संघटन बांधणी करणारे विरेंद्र बन्सोड यांना राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला.सन्मानचिन्ह,पुस्तक आणि शाल देऊन संजय बोधे आणि विरेंद्र बन्सोड यांना गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी रामदास कामडी होते.प्रमुख अतिथी म्हणून वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध विधीज्ञ ऍड.भूपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते हरी मेश्राम, वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी हरी मेश्राम, रामदास कामडी यांनी मनोगत व्यक्त केले.सत्काराला उत्तर देताना संजय बोधे आणि विरेंद्र बन्सोड यांनी आपण करीत असलेले कार्य समाजाच्या हितासाठी करीत आहोत.कशाचीही अपेक्षा न करता पुढेही आपण हे कार्य करीत राहू असा आशावाद व्यक्त केला.पुरस्कार वितरण समारंभाला सामाजिक कार्यकर्ते,शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभाचे प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले. संचालन कैलाश बोरकर यांनी तर आभार रावन शेरकुरे यांनी मानले.पुरस्कार वितरण समारंभाकरिता वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान, मूकबधिर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



