दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “महिलांचे आरोग्य सक्षम असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सुदृढ राहतो. त्यामुळे महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे,” असे मनोगत आळंदी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका साक्षी अक्षय कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
ध्यास फाउंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी बालकमंदिर, महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी, डॉक्टर माधवराव सानप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख पाहुण्या म्हणून साक्षी कुऱ्हाडे व उद्योजक अक्षय कुऱ्हाडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. माधवराव सानप, विश्वस्त डॉ.अमृता सानप, संचालिका अक्षता कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अमृता सानप यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध आजार, प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमित तपासणीचे महत्त्व विशद केले. जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन या मूल्यांमुळेच आरोग्यदायी जीवन शक्य असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका अश्विनी शिर्के यांनी केले, तर आभारप्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका विद्या खराडे यांनी केले. हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



