Home Social आळंदी सर्वांचीच; मराठवाडा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे…...

आळंदी सर्वांचीच; मराठवाडा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे… — मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी शहरात वास्तव्यास असलेल्या मराठवाडा भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली जाणार नाही. आळंदी ही सर्वांचीच आहे आणि मराठवाडा बांधवांच्या समस्या, प्रश्न व अडचणी नगरपरिषद स्तरावर संवेदनशीलतेने सोडवण्यात येतील, अशी ठाम भूमिका नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली.

         आळंदीत मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे तसेच नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना नगराध्यक्ष कुऱ्हाडे म्हणाले की, आळंदी ही संतांची व ऐक्याची भूमी असून विविध प्रांतांतील नागरिकांनी शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. मराठवाड्यातील नागरिक हे आळंदीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

        मराठवाडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, मा.चेअरमन बाबुलाल घुंडरे, मा.सभापती श्रीधर कुऱ्हाडे, गोविंद महाराज गोरे, अशोक उमरगेकर, मंडळाचे अध्यक्ष रेणुकादास पांचळ, जालिंदर भोसले, अनिल साळुंके, मंडाळाचे पदाधिकारी, मराठवाडा बांधव, नगरसेवक तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या शेवटी आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजघटकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निसारभाई सय्यद व आभारप्रदर्शन संतोषानंद शास्त्री यांनी केले.