दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यांनी मिळवलेला दणदणीत विजय हा शिस्तबद्ध प्रचार, अचूक नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचा परिपाक ठरला आहे. या संपूर्ण प्रचारयंत्रणेची जबाबदारी चेतन नाना कुऱ्हाडे यांनी समर्थपणे पार पाडली. त्याच बरोबर जय गणेश ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी अक्षरशः जीवाचे रान करत या विजयाला दिशा दिली.
नगराध्यक्ष पदाचे आरक्षत जाहीर झाल्यापासूनच प्रचाराची प्रत्येक पायरी काळजीपूर्वक आखण्यात आली. प्रभागनिहाय रणनीती, बूथस्तरावरील सूक्ष्म नियोजन, मतदारांशी थेट संवाद आणि विकासकामांचा मुद्देसूद प्रचार यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याला स्पष्ट जबाबदारी देत संघटन मजबूत करण्यात आले.
या मोहिमेत जय गणेश ग्रुपच्या कार्यकर्त्यांची भूमिका निर्णायक ठरली. शिस्तबद्ध प्रचार, घराघरांत भेटी, नागरिकांच्या समस्या समजून घेणे, मतदार यादी तपासणीपासून मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंत सर्व पातळ्यांवर कार्यकर्ते सक्रिय होते. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता त्यांनी प्रचारात झोकून दिले.
चेतन नाना कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली अनुभव आणि तरुणाईचा साधण्यात आला. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, प्रत्यक्ष भेटीगाठी, बैठका आणि जाहीर सभांच्या माध्यमातून सकारात्मक वातावरण निर्माण झाले. विकासाचा स्पष्ट आराखडा आणि विश्वासार्ह नेतृत्व यामुळे मतदारांचा विश्वास अधिक दृढ झाला. या विजयाने आळंदीच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडेंच्या नेतृत्वावर नागरिकांनी विश्वासाची मोहोर उमटवली आहे. या यशामागे चेतन नाना कुऱ्हाडेंचे अचूक नियोजन आणि जय गणेश ग्रुपसह सर्व कार्यकर्त्यांची मेहनत निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.



