Home Political पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला बळकटी; शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांचा जाहीर प्रवेश…

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला बळकटी; शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांचा जाहीर प्रवेश…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार पक्षप्रवेशांची लाट सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आकुर्डी–काळभोरनगर प्रभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

        प्रभागातील प्रभावशाली नेते म्हणून ओळख असलेल्या प्रमोद कुटे यांच्या प्रवेशामुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.

         या पक्षप्रवेशाच्या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, प्रचार प्रमुख नाना काटे, अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, वैशाली काळभोर, जगदीश शेट्टी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रमोद कुटे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करत, आगामी महापालिका निवडणुकीत एकजुटीने आणि ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

        “पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाची स्पष्ट दिशा दिली असून, तीच दिशा मला प्रेरणादायी वाटली. आकुर्डी व काळभोरनगर परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम व्यासपीठ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे मी पाहतो.

         पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन आणि आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांसह एकदिलाने प्रयत्न करेन,” असे प्रमोद कुटे यांनी सांगितले.