Home देशविदेश मेळघाटातील आदिवासी बांधवांची ऐतिहासिक ‘संसदवारी’… — खासदार बळवंतराव वानखडे यांच्या पुढाकारातून...

मेळघाटातील आदिवासी बांधवांची ऐतिहासिक ‘संसदवारी’… — खासदार बळवंतराव वानखडे यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील जनतेला लोकशाहीच्या मंदिराचे दर्शन… — प्रियंका गांधी व के.सी.वेणुगोपाल यांच्याशी थेट संवाद; पहिल्यांदाच दिल्ली पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

          दखल न्युज भारत

चिखलदरा :- आजवर आपल्या गावाची वेसही न ओलांडलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी थेट देशाची राजधानी नवी दिल्ली गाठत ऐतिहासिक संसद भवनाला भेट दिली. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतराव वानखडे यांच्या अभिनव संकल्पनेतून व विशेष प्रयत्नातून हा ‘संसद दर्शन’ उपक्रम साकार झाला. या उपक्रमामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या जीवनात एक नवा आत्मविश्वास, आनंद आणि लोकशाहीविषयीची जाणीव निर्माण झाली आहे.

         मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी शिक्षण, आरोग्य व दळणवळणाच्या दृष्टीने आजही दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. अनेक आदिवासी बांधवांचे आयुष्य जंगल, शेत व गावापुरते मर्यादित राहते. अशा परिस्थितीत देशाच्या लोकशाहीचे सर्वोच्च केंद्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी त्यांना मिळावी, या सामाजिक भावनेतून खासदार बळवंतराव वानखडे यांनी हा ऐतिहासिक उपक्रम हाती घेतला.

संसद भवनात ऐतिहासिक क्षण…

        या दौऱ्यात आदिवासी बांधवांनी नवी संसद भवन, लोकसभा व राज्यसभा कार्यपद्धतीची माहिती प्रत्यक्ष अनुभवली. लोकशाहीची प्रक्रिया कशी चालते, जनतेचे प्रतिनिधी कसे काम करतात, याची जाणीव या दौर्‍यामुळे त्यांना झाली. “आपणही या देशाचे नागरिक आहोत आणि संसद आपल्यासाठीच आहे,” अशी भावना यावेळी अनेक आदिवासी बांधवांनी व्यक्त केली.

प्रियंका गांधींशी थेट संवाद….

      या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे संघटन सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याशी झालेली प्रत्यक्ष भेट. खासदार बळवंतराव वानखडे यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा या वरिष्ठ नेत्यांशी अनौपचारिक संवाद झाला. यावेळी आदिवासी बांधवांनी आपल्या जीवनातील अडचणी, समस्या व भावना मोकळेपणाने मांडल्या. मोठ्या राष्ट्रीय नेत्यांकडून मिळालेल्या आपुलकीच्या वागणुकीने ते भारावून गेले.

यशोमती ठाकूर यांची संकल्पनात्मक साथ…

        या उपक्रमाला माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ताई ठाकूर यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. तसेच काँग्रेसचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

मान्यवरांची उपस्थिती…

       दिल्ली दौऱ्यात खासदार बळवंतराव वानखडे यांच्यासह चिखलदरा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, माजी जिल्हा परिषद सभापती दयारामजी काळे, संजय बेलकर, राजेशभाऊ सेमलकर, युवक काँग्रेसचे पियुष मालवीय शेख नवशाद नानकराम हतरु चे तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक पूल निर्माण करणारा उपक्रम…

       हा उपक्रम केवळ सहल न राहता दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना देशाच्या सर्वोच्च सभागृहाशी जोडणारा एक सामाजिक व वैचारिक पूल ठरला आहे. “लोकशाही ही फक्त पुस्तकातली संकल्पना न राहता प्रत्यक्ष अनुभवता यावी,” या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.