दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
दिनांक १५ डिसेंबर २०२५…
पुणे :- रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईसाठीची प्रक्रिया तात्काळ सुरु करा,अन्यथा पुणे महानगर पालिकेविरोधात शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत निषेध नोंदवू,असा इशारा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी,माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.१५) दिला.
पिंपरी-चिंचवड मनपाने रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत जखमी किंवा मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
परंतु,मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात पुणे मनपा उदासीन आहे,असा डॉ.चलवादी यांनी केला.
मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.७२/२०२३ वर सुनावणी घेत १३ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार,महापालिकेमार्फत विकसित रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधितांना मोबदला देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड मनपाने समिती गठीत करून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.दरम्यान,या पार्श्वभूमीवर पुणे मनपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
संबंधित आदेश पुणे मनपा वरही लागू असताना प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही.पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहिरात काढून नागरिकांना दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू केली असताना, पुणे महापालिकेची निष्क्रियता नागरिकांवर अन्याय करणारी आहे,असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.
खड्ड्यांमुळे होणारे अपघात नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत.अशा परिस्थितीत न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी दोन्ही महापालिकांनी समानपणे करणे अपेक्षित असताना, पुणे मनपाची उदासीनता गंभीर बाब असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.



