ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई), साकोली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी “खेलरंग” या वार्षिक खेळ महोत्सवाचे भव्य व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवाच्या अध्यक्षा म्हणून प्राचार्या भारती व्यास व प्रमुख पाहुणे डॉ.जितेन्द्र कुमार ठाकूर, अजय चांदेवर, शैलेश फुंडे व राम कुमार तसेच शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाज्योत प्रज्वलन व ध्वजवंदनाने करण्यात आली. त्यानंतर विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.
या वार्षिक खेळ महोत्सवात नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, १०० मीटर व २०० मीटर धावणे, रिले रेस, गोळाफेक, लांब उडी, बॅलन्स गेम तसेच बालवर्गासाठी खास आखलेल्या मनोरंजक व कौशल्यवर्धक स्पर्धांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळभावना, चिकाटी, शिस्त व आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन घडविले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण व सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. आजच्या डिजिटल युगात मैदानी खेळांचे महत्त्व अधिक वाढले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षा प्राचार्या भारती व्यास यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शालेय जीवनात शिक्षणासोबतच खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक सुदृढता, मानसिक संतुलन व नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी अशा क्रीडा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खेळ महोत्सवाच्या शेवटी पालकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच खेळ महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकवृंद, क्रीडा प्रशिक्षक, स्वयंसेवक व सहायक कर्मचारी यांचे विशेष आभार मानण्यात आले.
पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे, शिक्षकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे व व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे “खेलरंग” वार्षिक खेळ महोत्सव आनंद, उत्साह व शिस्तीच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.



