शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश कृतीतून साकारत रोटरी क्लब चिमूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारक्तदान शिबीराला चिमूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिशन लाइफ प्रोजेक्ट अंतर्गत सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत मानवतेची सेवा केली.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत राज्यभर राबवण्यात आलेल्या महारक्तदान मोहिमेत चिमूरने महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून नोंद केली. रक्तदानासाठी शिबिरस्थळी दात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या उपक्रमासाठी रा.तु. महाविद्यालय चिमूरचे प्राध्यापक प्रफुल राजुरवाडे, राष्ट्रीय सेना व छात्र सेना यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराचे संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थापन उपजिल्हा रुग्णालय चिमूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अश्विन अगडे, डॉ.सव्वालाखे आणि त्यांच्या टीमने सुरळीतपणे पार पाडले.
कार्यक्रमासाठी रोटरी क्लब चिमूरचे अध्यक्ष विनोद भोयर, सचिव राकेश बघेल, कोषाध्यक्ष मंगेश हिंगणकर, प्रोजेक्ट डायरेक्टर श्रेयस लाखे, प्रफुल बेत्तावार, अभिजित बेहते, डॉ.आशिष पाटील, राजेंद्र संगमवार, विलास अल्लडवार, परेश दंदे, गुरुदास ठाकरे, विशाल गंपावार, डॉ.महेश खानेकर यांच्यासह अनेक सदस्य, मान्यवर आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
रक्तदान केल्यानंतर दात्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि मदतीचा आनंद व्यक्त करणारी स्मितरेषा झळकत होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चिमूरमध्ये रक्तदानाची संस्कृती दिवसेंदिवस बळकट होत असून या उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले की चिमूर मानवतेच्या कार्यात सदैव अग्रणी!



