अबोदनगो एस चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- अमरावती पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपी श्रावण बनारसे उर्फ छोटा डॉन याला अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर अटक केली आहे.
दिनांक २५/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा हद्दीतील महादेवखोरी येथील पुलाजवळ रंजीत रामटेके यांच्यावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे कलम १०३(१), ३(५) भा.न्या.स. अंतर्गत गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील आरोपी श्रावण राजेश बनारसे, वय १८ वर्ष, रा. वरूण नगर, अमरावती, हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. आरोपी हा सराईत असल्यामुळे वेळोवेळी आपले राहण्याचे ठिकाण बदलत होता.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा समांतर तपास सुरू असताना दिनांक ०८/१२/२०२५ रोजी पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीतील आदर्श हॉटेलसमोर एका इसमावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूहल्ला केला असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली असता जखमी व्यक्ती फरार झालेली होती. अधिक तपासात जखमी व्यक्ती हीच फरार आरोपी श्रावण बनारसे असल्याचे समोर आले.
गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २० मिनिटांत आरोपीचा शोध लावला. विचारपुस केली असता त्याने यशोदा नगर येथील राहूल धर्माळे, अंशू पटेल आणि शिवम यांच्याशी जुन्या वादातून झालेल्या चाकूहल्ल्याची माहिती दिली. आरोपीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यानंतर पोलीस स्टेशन कोतवाली येथे फिर्याद नोंदवून, पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.
अमरावती पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण हद्दीतील इतर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.
डॉनच्या विविध गुन्ह्यांची माहिती…
फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २५/०८/२०२५ रोजी महादेवखोरी येथील पुलाजवळ रंजीत रामटेके यांच्यावर घातलेल्या जिवघेण्या हल्ल्याप्रकरणी अप.क्र. ७०८/२०२५ कलम १०३(१), ३(५) भा.न्या.स. अंतर्गत गुन्हा दाखल होता. तसेच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. ५४३/२०२५ कलम ३०९(६), ३(५) भा.न्या.स. नोंदवला गेला आहे. नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत ३९२/२०२५ कलम ३०९(४), ३२४(२), ३(५) भा.न्या.स., तर पोलीस स्टेशन तिवसा, अमरावती ग्रामीण हद्दीत ६४८/२०२५ कलम ३०९(६), ३५१(२), ३५१(३) आणि ५७७/२०२५ कलम ३०९(४), ३०९(६) भा.न्या.स. गुन्हे दाखल झाले आहेत.
ही कारवाई अमरावती पोलीस आयुक्तालय व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कामगिरीची देखरेख पोलीस आयुक्त श्री.अरविंद चावरीया, पोलीस उपायुक्त श्री.शाम घूगे, पोलीस उपायुक्त श्री.गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्री.रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.शिवाजी बचाटे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दिपक सुंदरकर, अतुल संभे, जहीर शेख, संग्राम भोजने आणि सुरज चव्हाण यांनी आरोपीला अटक करण्याची कारवाई पूर्ण केली.



