ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा – जागतिक मृदा दिन दरवर्षी ५ डिसेंबरला साजरा केला जाणारा जागतिक मृदा दिन (World Soil Day) “मातीचे आरोग्य – अन्नसुरक्षेचा पाया” या प्रमुख संकल्पनेवर आधारित आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेतर्फे (FAO) जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
माती ही मानवजीवनाचा पाया असून जागतिक अन्न उत्पादनापैकी जवळपास ९५ टक्के अन्न मातीवर अवलंबून आहे. मात्र अनियंत्रित रासायनिक वापर, जमिनीचे धूप, कीटकनाशकांचा अति वापर, तसेच हवामानबदल यांमुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, जगातील ३३% जमीन दर्जाहीन झाली असून उत्पादनक्षमता घटत चालली आहे.
राज्यातही अनेक भागांमध्ये सेंद्रिय कार्बनची कमतरता, कठीण थर निर्माण होणे, खारवटपणा, उध्वस्त माती असे प्रश्न गंभीर झाले आहेत. याबाबत कृषी विभाग यांच्या माध्यमातून विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.जागतिक मृदा दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी रुपाली जाधव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की माती परीक्षण, सेंद्रिय शेती, पाणी-बचत तंत्रे आणि हिरवळी खतांचा वापर वाढवून मातीचे आरोग्य जपावे.
आज तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुरखेडा यांच्या वतीने भगवानपुर येथे जागतीक मृदा दिनाच्या निमित्ताने शेतकरी सभा आयोजित उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, जमीन सुपीकता निर्देशांक व जमीन आरोग्य पत्रिका आधारित खतांचा संतुलित वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय खते तसेच हिरवळीचे खते वापरण्याचे फायदे , माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक व त्याची पद्धती याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी कनिष्क वाघमारे यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
सोबतच उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करून त्याचे वाचन करून जमिनीच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.



