Home देशविदेश संस्था,कायदे आणि स्वातंत्र्य…

संस्था,कायदे आणि स्वातंत्र्य…

        संस्था म्हटलं की तिथे कायदे आलेच आणि कायदे म्हणजे बंधन, बंधन याचा अर्थ पारतंत्र्य, आणि पारतंत्र म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. 

        तरीपण कायद्याने बंदिस्त असलेल्या संस्थांमध्ये स्वातंत्र्य कसे मिळवायचे हा चिंतनाचा विषय आहे. 

        संस्थेचे दोन प्रकार आहेत एक औपचारिक संस्था आणि दुसऱ्या म्हणजे अनौपचारिक संस्था, अनौपचारिक संस्था म्हणजेच पारंपारिक संस्था, सामाजिक संस्था. 

        औपचारिक संस्था म्हणजे, सरकारी दरबारी ज्यांची नोंद होते अशा संस्था अर्थात त्या आर्थिक असतील शैक्षणिक वैद्यकीय किंवा सामाजिक धार्मिक सांस्कृतिक अशा क्षेत्रातील ज्या रजिस्टर संस्था आहेत त्यांना औपचारिक संस्था असे म्हटले जाते किंवा त्यांना एनजीओ पण म्हटले जाते, तसेच संविधान कृत संस्था या सुद्धा औपचारिक संस्थाच म्हटल्या पाहिजेत कारण त्या संविधानाने बांधलेल्या असतात उदाहरणार्थ कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. तसेच लोकशाही जिवंत राहण्यासाठी निर्माण केलेल्या उपसंस्था म्हणजे काही आयोग जसे की निवडणूक आयोग, रिझर्व बँक, इ डी, सीबीआय, अधिकारी निवड मंडळ इत्यादी. 

   पारंपारिक अनौपचारिक संस्था यामध्ये कुटुंब संस्था, जात संस्था, धर्म संस्था, अशा काही समाजाच्या रूढी परंपरा नुसार निर्माण झालेल्या संस्था, किंवा धर्मशास्त्रानुसार निर्माण झालेल्या धार्मिक संस्था. 

       संस्था चे औपचारिक आणि अनौपचारिक अशी दोन प्रकार जरी असले तरी संस्था म्हटल्यानंतर त्याचे एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे त्या संस्थेला ध्येय असते काही उद्दिष्टे असतात काही नियम असतात आणि काही कार्यक्रम असतात. ध्येय प्राप्त करण्यासाठी त्या संस्था त्यांच्या नियमांचे पालन करतात काही उद्दिष्ट ठरवतात काही कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना दिसतात. सरकार ही सुद्धा एक संस्थाच आहे. ज्या संस्थेचे ध्येय उद्दिष्ट नियम कार्यक्रम हे सारे संविधानामध्ये आहे. औपचारिक असो की अनौपचारिक संस्था त्याला ट्रस्ट पण म्हणत असतात, ट्रस्ट इन्स्टिट्यूशन याचा अर्थ विश्वस्त संस्था, विश्वस्त संस्था म्हणजेच संस्थेतील सर्व सभासदांनी एका विचारासाठी एकमेकांवर विश्वास ठेवून ठराविक नियमाचे पालन करून मार्गक्रमण करणे म्हणजे ट्रस्ट इन्स्टिट्यूशन होय. अनौपचारिक संस्थांचे रजिस्ट्रेशन जरी नसले, त्यांची लिखित अशी घटना जरी नसली, तरीपण तिला ध्येय उद्दिष्टे नियम आणि कार्यक्रमासतात त्यानुसार ती चालते अशा संस्थेला अनौपचारिक संस्था म्हणतात उदाहरणार्थ कुटुंब संस्था आणि जाती संस्था. जगात ख्रिश्चन इस्लाम हिंदू शेख जैन योगी इत्यादीचे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माचे एक एक धर्मग्रंथ आहेत ज्याला पवित्र ग्रंथ म्हणतात त्या पवित्र ग्रंथात जे काही ध्येय उद्दिष्टे नियम कार्यक्रम असतात त्या पवित्र ते पवित्र ग्रंथ म्हणजेच त्या त्या धर्म संस्थेचे धर्मसंस्थेची नियमावली किंवा घटना म्हणजे संविधानच होय. त्यानुसार त्या धर्माचा तो समाज आपले जीवन जगत असतो. 

     संस्था ही औपचारिक असो की अनौपचारिक असो जिल्हाध्येय उद्दिष्टे नियम आणि कार्यक्रम असतात त्यानुसारच त्या स्वतःला बांधून घेऊन चालत असतात, म्हणजे ते त्या संस्थेत बंदिस्त असतात, अर्थात काही मनाने तर काही विचाराने तर काही मनाने किंवा विचाराने बांधलेले नसूनही केवळ त्या जातीत किंवा त्या धर्मात आपला जन्म झाला त्याचे आपल्यावर संस्कार आहेत ते पाळावेत म्हणून म्हणजे ह्या विचाराने काही लोक आपले जीवन जगत असतात. 

      आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रातील ज्या रजिस्टर म्हणजे औपचारिक संस्था आहेत ज्यांना आपण एनजीओ म्हणतो त्या त्यांच्या घटनेनुसार म्हणजे नियमावलीनुसार चालत असतात त्यांची वार्षिक अधिवेशन होता त्यात त्यांचा हिसाब किताब होत असतो त्याचप्रमाणे अनोपचारिक संस्थांचे पण जरी हिसाब किताब लिखित नसले तरी पण अलिखित का होईना होतच असतात. औपचारिक असो की अनौपचारिक असो दोन्ही संस्थांना नियमावली असल्यामुळे त्या नियमाच्या बंधनात राहूनच कार्य करावे लागते, ती बंधने म्हणजे च कायदे होत. याचा अर्थ पारंपारिक संस्था असो की औपचारिक संस्था असो त्यांना बंधने असतात, आणि जिथे बंधने असतात तिथे स्वातंत्र्य नसते. आणि बंधने नसतील तर त्या संस्था विशिष्ट पद्धतीने चालविता येत नाहीत. मी स्वातंत्र्याची अडचण आहे. 

    स्वातंत्र्याची खरी व्याख्या हीच असली पाहिजे की , प्रगतीसाठी संस्था या जरूर असाव्यात परंतु अटी नियमानेच प्रगती केली पाहिजे असे बंधन असता कामा नये. म्हणजेच अटी आणि नियम ए न पाळता जर कुणाला प्रगती करून घेता येत असेल तर त्याला त्याची उभा असली पाहिजे. कारण प्रगती आणि विकास याची व्याख्या व्यक्ती परत्वे बदलत असते. विकास म्हणजे काय किंवा प्रगती म्हणजे काय ? हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला असला पाहिजे तरच त्याला स्वातंत्र्य म्हणता येईल. आणि त्याच्या त्या प्रगतीसाठी त्याला मुक्त स्वातंत्र्य पाहिजे. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे स्वेराचार नव्हे हे गृहीत धरून, व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने प्रत्येक माणूस त्याला त्याच्या विचाराप्रमाणे प्रगती करायची असल्यास त्याला मुभा असली पाहिजे, यालाच खरे स्वातंत्र्य म्हणतात. एखाद्या संस्थेत आणि त्या संस्थेच्या नियमावलीत अडकून बसणे कुणाला आवडत नसेल किंवा योग्य वाटत नसेल तर त्यास आपली प्रगती मुक्तपणे करून घेण्याची परवानगी समाजाने म्हणजे जातीने धर्माने सरकारने त्यास दिली पाहिजे. तरच व्यक्ती स्वातंत्र्याचा खरा आनंद त्या व्यक्तीस मिळू शकेल. 

     कुटुंब संस्था आणि तिचे नियम, जात संस्था आणि तिचे नियम, धर्म संस्था आणि तिचे नियम, सरकार संस्था आणि तिचे नियम, हे व्यक्तीला पाळायचे नसतील, आणि त्याच्या त्या न पाळण्यामुळे देशाला समाजाला कुटुंबाला त्रास होत नसेल किंवा धोका होत नसेल तर अशा नागरिकास किंवा कुटुंबाच्या सदस्यास किंवा जाती धर्माच्या सदस्यास त्याच्या विचाराप्रमाणे त्याला वर्तन करण्याची मुभा असली पाहिजे, असे झाले तरच स्वातंत्र्याचा खरा अर्थ तयार होईल, अन्यथा संस्थांच्या नियमावलीत किंवा सरकारच्या कायद्यात स्वतःला बांधून घेऊन जगणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. स्वातंत्र्याचा अर्थ एका वाक्यात सांगायचं झाल्यास ” काया वाचा मने माझ्या वर्तनाने इतरांना दुःख पीडा त्रास न होता मला माझ्या इच्छेने जीवन जगता आले पाहिजे, असे जीवन म्हणजेच स्वातंत्र्य होय.”

     अर्थात या व्याख्येनुसार मला माझ्या वर्तणाने कुणाला शारीरिक इजा होणार नाही परंतु माझे वर्तन आणि विचार यामुळे इतरांना दुःख होत असेल म्हणजे मानसिक त्रास होत असेल तर काय करायचे ? हा प्रश्न शेवटी उभा राहतोच. आणि नेमकी इथेच वैचारिक लढाई सुरू होते. कारण मला जे आवडते मला जे योग्य वाटते ते जर इतरांना आवडत नसेल किंवा योग्य वाटत नसेल तर अशावेळी काय करायचे ? हाच खरा प्रश्न स्वातंत्र्य या संकल्पने पुढे उभा असतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत असताना ही अडचण येते, अंधश्रद्धा पाळणाऱ्यांना ती अंधश्रद्धा योग्यच आहे किंवा त्यांच्या आवडीचे आहे अशावेळी अंधश्रद्धा न पाळणाऱ्यांनी काय करायचे ? अशावेळी विवेकाचा जागर महत्त्वाचा असतो. विवेकाचा जागर याचा अर्थ भावनेला जास्त महत्व न देता विचाराला महत्त्व दिले पाहिजे, म्हणजेच सत्य काय असत्य काय, न्याय काय अन्याय काय, योग्य काय अयोग्य काय, चांगले काय वाईट काय, ईस्ट अनिष्ट, हे समजणे आणि त्यातील फरक समजने म्हणजे विवेक होय. व्यवहारात माणसाने विवेकाचा वापर केला तर अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी दूर होतात, विचारातील गुंता सुद्धा सुटतो. परंतु सर्वसाधारणपणे सामान्य बुद्धीची माणसे विवेकाच्या भानगडीत पडत नाहीत किंवा बुद्धीचा वापर करत नाहीत ते केवळ भावनेच्या आधारात आधारित सारा व्यवहार करत असतात, आपले जीवन व्यतीत करत असतात. म्हणूनच समाजात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. स्वातंत्र्य म्हणजे काय, खरे स्वातंत्र्य आणि खोटे स्वातंत्र्य यात फरक करता येत नाही असे झाले आहे. 

     माणसाला त्याच्या विचाराने आणि आवडीनिवडीनुसार जीवन जगता यावे, अशी परिस्थिती किंवा वातावरण निर्माण होणे म्हणजे स्वातंत्र्य होय. परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. समाज विकास आणि प्रगतीच्या नावाने अनेक औपचारिक अनौपचारिक अशा संस्था निर्माण करतो आणि स्वतःवर बंधने लादून घेतो आणि आपले स्वातंत्र्य गमावतो जसे की रेशमी किडा स्वतःच स्वतः भोवती कोश निर्माण करून स्वतःला त्या कोशात बंदिस्त करून घेऊन गुदमरून मरतो. 

      जीवनसंपन्न व्हावे, जीवनाचा विकास व्हावा, जीवन प्रगत व्हावे, यासाठी कायदे करावे, संस्था निर्माण कराव्या, त्या कायद्याचे आणि संस्थांचे संरक्षण करण्यासाठी सरकार निर्माण करावे आणि त्यात स्वतःला बांधून घ्यावे किंवा बंदिस्त करावे यास स्वातंत्र्य म्हणतात येणार नाही तर स्वतःने स्वतःच निर्माण केलेले पारतंत्र्य परावलंबन होय असेच म्हणावे लागेल. किंवा बंदिस्त स्वातंत्र्य असे म्हणावे लागेल, मुक्त स्वातंत्र्य यास म्हणता येणार नाही. 

      बंदिस्त स्वातंत्र्य म्हणजे आपण होऊन काही लोक एकत्र येऊन नियमावली तयार करून त्याने मावलीला बांधून घेणे म्हणजे बांध बंदिस्त स्वातंत्र्य होय, आणि कोणत्या संस्था निर्माण न करता, कायदे कानून बनविता, अनौपचारिकपणे नैतिकतेचे जीवन जगणे म्हणजेच मुक्त स्वातंत्र्य होय. अर्थात नैतिकता म्हणजे काय ते नैतिकता आणि त्या नैतिकतेचे पालन तर करावीच लागते, तेव्हा अनौपचारिक का होईना परंतु बंधने पाळावीच लागतात,म्हणून त्या सुद्धा मुक्त स्वातंत्र्य कसे म्हणता येईल ? असाही प्रश्न पडू शकतो, परंतु माझ्या मते बंदिस्त स्वातंत्र्य आणि मुक्त स्वातंत्र्य यात फरक जो आहे तो महत्त्वाचा आहे, तो फरक म्हणजे मुक्त स्वातंत्र्यात माणसाला भौतिक किंवा शारीरिक इजा पोहोचत नाही, त्यास जेलमध्ये जावे लागणार नाही, कोणी पकडून नेणार नाही. आणि नैतिकता ही कठोर नसते, कारण स्थल काल परिस्थितीनुसार ती बदलत असते. ती सर्वांनाच मान्य असते. 

        लेखक : दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : १० डिसेंबर 2025, फोन : 9420912209.