Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्र.५ मध्ये खुशी बोरुंदिया व संतोष रासकर...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्र.५ मध्ये खुशी बोरुंदिया व संतोष रासकर यांच्या संवाद रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपाच्या खुशी बोरुंदिया व संतोष रासकर यांच्या प्रचाराने स्वतंत्र वेग घेतला असून मंगळवारी आयोजित संवाद रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

          सकाळपासूनच परिसरातील विविध गल्ली–बोळांतून नागरिक स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभागी झाले. महिलांपासून युवक, ज्येष्ठ नागरिक ते व्यावसायिक वर्गापर्यंत सर्वांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला.

         रॅलीची सुरुवात प्रभागातील विठ्ठलवाडी येथून झाली. ढोल–ताशांच्या निनादात, भगवे झेंडे, आकर्षक फलक आणि घोषणांनी वातावरण भारून गेले. रॅलीतून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रभागातील विकासकामांची माहिती नागरिकांसमोर मांडली.

“कामगिरी आणि विश्वास” हेच भांडवल – खुशी बोरुंदिया

         यावेळी खुशी बोरुंदिया यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, आगामी काळात प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट्स आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांच्या उन्नतीवर भर दिला जाईल. विशेषतः महिलांसाठी सुरक्षाव्यवस्था मजबूत करणे, सेल्फ–हेल्प गटांना प्रोत्साहन देणे आणि युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

         “प्रभागातील मूलभूत सुविधा सुरळीत करण्यावर आमचा भर आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि स्वच्छतेतील अडथळे दूर करून प्रभागाचा दर्जा उंचावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवत प्रत्यक्ष कामगिरी दाखवण्यावरच आमचा विश्वास आहे. मिळणारा प्रतिसाद हा विकासाच्या दिशेने प्रोत्साहन देणारा आहे. असे संतोष रासकर यांनी सांगितले.

         नागरिकांचा विश्वास वाढवणारा प्रतिसाद या रॅलीमधील वातावरण पाहता प्रभागात भाजपा पॅनेलला नागरिकांची चांगली पसंती मिळत असल्याचे चित्र दिसले.

स्थानिक समस्यांवर थेट संवाद…

         रॅलीदरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा स्वच्छता आदी मुद्दे उपस्थित केले. उमेदवारांनी प्रत्येक ठिकाणी थांबून त्या समस्यांचे बारकाईने परीक्षण केले व निवडून आल्यास तातडीने त्यावर उपाय करण्याचे आश्वासन दिले.

प्रभागातील निवडणूक तापमान वाढले…

         रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. भाजपाचे खुशी बोरुंदिया व संतोष रासकर या जोडीचा प्रचार वेगात असून, नागरिकांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले.